“शेतकऱ्यापुढे हजार तोंडांचा रावण उभा असतो”; कृषी, संशोधन आणि बाजारव्यवस्था बळकट करण्याची गरज – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्या कृषी धोरणांचे स्मरण

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

महाराष्ट्रातील शेतीला औद्योगिक स्वरूप देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचे ऐतिहासिक कार्य स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी केले. शेतकरी संपन्न, स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हावा, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या दूरदृष्टीचा वारसा पुढे नेत विदर्भातील कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत कृषी विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळाली, असे प्रतिपादन माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

जयहिंद लोक चळवळीच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या मोहाडी येथे राज्यातील युवा शेतकऱ्यांचा, महिला शेतकऱ्यांचा शेतीतील योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह खासदार भास्कर भगरे, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या संकटांचा उल्लेख करताना त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दांची आठवण करून दिली. “रामापुढे दहा तोंडांचा रावण होता; पण शेतकऱ्यापुढे हजार तोंडांचा रावण उभा असतो,” असे चव्हाण म्हणायचे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, तर कधी बाजारभावातील घसरण यासारख्या असंख्य संकटांना शेतकऱ्यांना सातत्याने सामोरे जावे लागते. एवढ्या संकटांशी झुंज देऊनही शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, ही परिस्थिती बदलली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ आणि योग्य दर मिळावा, या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांची संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात आली. बाजार समित्या आजही शेतकऱ्यांच्या हिताचे प्रभावी व्यासपीठ असून, ही व्यवस्था अधिक सक्षम आणि बळकट करण्याची आवश्यकता आहे.

जय हिंद लोकचळवळीचे कौतुक ; डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या कार्याचा गौरव

जय हिंद लोकचळवळीचा उल्लेख करताना थोरात यांनी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी जय हिंद लोक चळवळीसाठी गेली २५ वर्षे केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक केले. युवकांच्या चळवळीचे सामाजिक चळवळीत रूपांतर करण्याचे ध्येय त्यांनी यशस्वीपणे राबविले असून, या चळवळीत काम करणारा तरुण चुकीच्या मार्गाला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार सत्यजित तांबे यांनी या लोकचळवळीला जागतिक स्वरूप दिले असून, ऑनलाइन माध्यमातून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, अभ्यासक आणि विद्वान युवकांशी संवाद साधत असल्याने मोठ्या प्रमाणावर युवक या चळवळीशी जोडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्रीपद आणि त्यांचे खाते यावर मिश्कील टिप्पणी करताना थोरात म्हणाले, “रावल हे वरिष्ठ आमदार आहेत. त्यांना आणखी चांगले खाते मिळाले असते. मात्र त्यासाठी ‘लॉबिंग’ करावे लागते. ते त्यांच्याकडे चालते की नाही माहीत नाही ; पण आमच्याकडे मात्र तसे चालते.” त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला. 

‘शेतकरी हा आपला, कृषी हा आपला धर्म’

आपल्या कृषिमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना थोरात म्हणाले, “मी स्वतःहून कृषी खाते मागून घेतले आणि तब्बल साडेसहा वर्षे या खात्याची जबाबदारी सांभाळली. माझ्यानंतर किती कृषिमंत्री बदलले, ते मोजून पाहा. सहा-सहा महिन्यांनी मंत्री बदलले जातात. हे खाते स्वीकारायलाच अनेकजण तयार नसतात. शेतकरी हा आपला आहे आणि कृषी हा आपला धर्म आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी सातत्याने काम करण्यापेक्षा मोठे भाग्य दुसरे नाही.”

कृषी विद्यापीठांची दयनीय अवस्था ; संशोधनासाठी तातडीने मनुष्यबळ भरा

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आज केवळ ३० टक्के कर्मचारी कार्यरत असून तब्बल ७० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे संशोधनावर गंभीर परिणाम होत आहे, अशी खंत व्यक्त करत थोरात यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांना उद्देशून सांगितले, “मुख्यमंत्र्यांशी तुमची जवळीक आहे. त्यांना सांगा की कृषी विद्यापीठांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. संशोधनाला चालना मिळाली पाहिजे, नवे तंत्रज्ञान विकसित झाले पाहिजे आणि कृषी विद्यापीठे ही ज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांची सक्षम केंद्रे बनली पाहिजेत.”

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!