वर्मा कंपनीचे सांडपाणी शेतकऱ्यांच्या मुळावर !

बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

येवला तालुक्यातील बदापूर येथील शेतकऱ्यांसमोर सध्या एक मोठे संकट उभे राहिले आहे. येथील ‘वर्मा कंपनी’कडून गेल्या महिनाभरापासून रासायनिक आणि दूषित सांडपाणी उघड्यावर तसेच शेताच्या कडेला असलेल्या नाल्यांमध्ये सोडले जात आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरातील शेतीचे आणि पर्यावरणाचे नुकसान होत असून, संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

 

कंपनीतून निघणारे हे केमिकलचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. हे पाणी आता शेतीसाठी किंवा पिण्यासाठी योग्य राहिलेले नाही. दुर्दैवाने, याच विहिरींचे पाणी पिकांना दिल्याने शेतातील पिके जळून जातात, तर सुपीक जमीन नापीक बनत चालली आहे. या दूषित पाण्यामुळे मुख्यत्वे ऊस पिकाला खूप मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

 

परिस्थिती एवढी गंभीर बनली आहे की, मागील ७ ते ८ दिवसांत हे रासायनिक सांडपाणी स्थानिक तलावात जाऊन मिसळल्यामुळे तलावातील शेकडो मासे मोठ्या प्रमाणावर मरून पडले आहेत. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

या गंभीर समस्येची दखल घेत बदापूर येथील ग्रामस्थ आणि शेतकरी नानासाहेब महिपत मोरे व इतर सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. त्यांनी या संदर्भात येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, स्थानिक आमदार, मंत्री छगन भुजबळ आणि बदापूर ग्रामपंचायत यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषी कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी आर्त हाक बदापूरच्या शेतकऱ्यांनी दिली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!