कृषीदूत शेतकऱ्यांच्या बांधावर !
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथे मालदाड येथील श्रमशक्ती कृषि महाविद्यालयाच्या कृषीदूतांचे आगमन झाले असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्नक (RAWE & AIA) कार्यक्रमाच्या माध्यमातून हे कृषीदूत गावामध्ये वास्तव्यास राहून शेतकरी व ग्रामीण भागाशी प्रत्यक्ष संवाद साधत कृषीविषयक मार्गदर्शन करणार आहेत.

सेवा संस्कार संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या श्रमशक्ती कृषि महाविद्यालय, मालदाड येथील विद्यार्थी शिक्षण घेत असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रम समन्वयक प्रा. निलेश तायडे व कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. डी. तायडे आणि सर्व विषय विशेषज्ञ यांच्या सूचनेनुसार कृषीदूत अथर्व भालेराव, ज्ञानेश्वर सावंत, दिग्विजय पवार, समर्थ निकम, सोहम रोकडे व ओंकार हांडे हे सायखिंडी गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांच्या समस्या, अनुभव व शेतीपद्धती जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

कृषी शिक्षणाच्या माध्यमातून हे कृषीदूत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, गांडूळ खत निर्मिती, चारा पिके, फळबाग व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, आधुनिक सिंचन पद्धती, बायोगॅस आदी विषयांवर माहिती व मार्गदर्शन देणार आहेत.
यावेळी सायखिंडी गावच्या सरपंच नीलम पारधी, उपसरपंच दिपक करंजकर, ग्रामपंचायत कर्मचारी, प्रगतशील शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
