आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती सक्षम करा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रम; एल-निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यातील पिकांना प्राधान्य देण्याचे आवाहन

अहिल्यानगर | प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत उत्साहात कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती, जलसंधारण, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, भारतीय हवामान विभागाने यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात आणि जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतीचे नियोजन करून कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. तसेच तालुक्यानुसार हवामान, मातीचा प्रकार आणि उपलब्ध पाण्याचा विचार करून पीक निवड करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

जिल्ह्यात रुंद वाफा-सरी पद्धतीचा वापर अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याचे सांगत त्यांनी कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीत या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करण्याचे आवाहन केले. कृषी विभागानेही या पद्धतीचा प्रभावी प्रसार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

एल-निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून जिल्ह्यात वृक्षलागवड, मृद व जलसंधारण, जलसंवर्धन तसेच लघुपाटबंधारे, पाझर तलाव, के.टी. वेअर आणि इतर जलसंधारण संरचनांच्या दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनांच्या माध्यमातून भूजल पुनर्भरणालाही चालना दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शेतकऱ्यांचा विकास झाल्याशिवाय राज्य आणि देशाचा विकास शक्य नसल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, समूह शेती, यांत्रिकीकरण आणि वैज्ञानिक शेती पद्धतींचा अवलंब करून शेतकऱ्यांनी कृषी उद्योजक बनण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा कृषी अधिकारी सुधीर शिंदे, आत्मा प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, पशुसंवर्धन उपायुक्त उमेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!