कासारादुमाला येथे गावठी दारू हातभट्टी वर छापा … आरोपी फरार

संगमनेर प्रतिनिधी –

कासारादुमाला परिसरातील म्हाळुंगी नदीलगत सय्यद बाबा दर्ग्याजवळ गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १०० लिटर कच्चे रसायन आणि १५ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू, असा एकूण ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी गोकुळ बबन सूर्यवंशी (रा. कसारा दुमाला, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) हा फरार आहे.

ही कारवाई ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी करण्यात आली. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विवेक दत्तू जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली. पोलीस ठाण्यात उपस्थित असताना पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब जगन्नाथ लोखंडे, मपोहेकॉ चारुशिला अंबादास गोणके, पोलीस शिपाई विक्रांत देशमुख, पोलीस शिपाई हरिश्चंद्र यशवंत बांडे आणि पोलीस विशाल रामदास कर्पे यांच्यासह पोलीस पथकाला गुप्त बातमी मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ बबन सूर्यवंशी हा आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन वापरून विनापरवाना गावठी दारू तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टी लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंचांसह पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

घटनास्थळी पोलिसांना एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये १०० लिटर कच्चे रसायन, किंमत ७ हजार रुपये, तसेच १५ लिटर तयार गावठी हातभट्टीची आंबट व उग्र वास असलेली दारू, किंमत १ हजार ५०० रुपये, असा मुद्देमाल आढळून आला. एकूण मुद्देमालाची किंमत ८ हजार ५०० रुपये आहे.

जप्त केलेल्या तयार दारूमधून १८० मिलीचा एक नमुना रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला असून, उर्वरित मुद्देमाल पंचांसमक्ष जागेवरच नष्ट करण्यात आला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५ (फ), ६५ (क), ६५ (ड) आणि ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार अशोक भिवाजी पारधी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!