प्रेमविवाह केल्याच्या रागातून नवविवाहित दाम्पत्यावर हल्ला ; पत्नीला तवेरा गाडीतून घेऊन गेल्याची तक्रार
संगमनेर प्रतिनिधी –
प्रेमविवाह केल्याच्या रागातून नवविवाहित दाम्पत्याच्या चारचाकीला तवेरा गाडीने धडक देत काचा फोडून मारहाण केल्याची तसेच नवविवाहित महिलेला जबरदस्तीने तवेरा गाडीत बसवून घेऊन गेल्याची तक्रार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी जगदीश आहेर, आर्यन आहेर, दर्शन आहेर, तेजस आहेर यांच्यासह चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महेश बबन शिरसाठ (वय 24, व्यवसाय नोकरी, रा. हसनापूर रोड, मुसळे वस्ती, लोणी, ता. राहाता) यांनी 5 ऑगस्ट 2026 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महेश शिरसाठ हे लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया टेक्निशियन म्हणून काम करतात. तक्रारीनुसार, त्यांचे मानसी जगदीश आहेर, रा. नाशिक हिच्यासोबत मागील सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले होते; मात्र मानसीच्या कुटुंबीयांचा या विवाहाला विरोध असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

5 ऑगस्ट रोजी महेश शिरसाठ व मानसी आहेर यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची येथील श्री सद्गुरू भवन मंगल कार्यालय येथे प्रेमविवाह केला. त्यानंतर महेश यांचे मित्र नवनाथ संदीप बुधकर, प्रेम मनोज इंगे आणि दादासाहेब तांबे यांच्यासह ते पाच जण एमएच 12 जेसी 2578 क्रमांकाच्या चारचाकीने आळंदीहून संगमनेरमार्गे लोणीकडे जात होते.
सायंकाळी सुमारे 7 वाजता संगमनेर येथून लोणी रोडला जात असताना दिल्ली नाका परिसरात मागून आलेल्या तवेरा गाडीने त्यांच्या वाहनाला आडवे होत धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर तवेरा गाडीतून जगदीश आहेर, आर्यन आहेर, दर्शन आहेर, तेजस आहेर व चार अनोळखी इसम खाली उतरले. त्यांनी लोखंडी रॉड, हॉकी स्टिक व दगडांचा वापर करून चारचाकीच्या काचा फोडल्या आणि दरवाजा उघडून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

महेश शिरसाठ यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना तसेच त्यांच्या मित्रांना हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. त्यानंतर मानसी आहेर हिला चापटीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि तिला तवेरा गाडीत बसवून नेण्यात आले. या घटनेनंतर महेश व त्यांचे मित्र घाबरून घटनास्थळावरून निघून गेले आणि महेश यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीत नमूद केलेल्या आरोपींमध्ये जगदीश आहेर, आर्यन आहेर, दर्शन आहेर आणि तेजस आहेर, तसेच नाव-पत्ता माहीत नसलेले चार अनोळखी इसम यांचा समावेश आहे. जगदीश, आर्यन, दर्शन व तेजस आहेर यांचा पत्ता चेतना नगर, नाशिक असा नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 137(2), 126(2), 118(1), 324(4), 189(2), 191(2), 191(3), 190, 352, 351(2) आणि 115(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
