अवैध गुटखा विक्रेत्यांवर एलसीबीची धाड ; १ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरोधात कारवाई केली.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, बिरप्पा करमल, अशोक लिपणे, राहुल डोके, रणजीत जाधव व अमृत आढाव यांच्या पथकाने १५ ऑगस्ट २०२६ रोजी शिर्डी परिसरात कारवाई केली. पथकाने पंचासमक्ष दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला.

या कारवाईत एकूण आठ आरोपींविरुद्ध तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून विविध कंपन्यांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण १ लाख ७९ हजार १७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये विनोद बाबुराव ठोंबरे (वय ५०, रा. नांदुर्खी रोड, शिर्डी), हबीब उर्फ सोहेल अन्सारी (रा. शिर्डी), बद्रीनाथ पंढरीनाथ लोखंडे (वय ५४, रा. शिर्डी), अलीम शेख, कलीम शेख, जितेंद्र लालचंद लोढा (वय ४८, रा. रूई, ता. राहाता), बंटी लहामगे (रा. राहाता) आणि अमोल जाधव (रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. यापैकी हबीब उर्फ सोहेल अन्सारी, अलीम शेख, कलीम शेख, बंटी लहामगे व अमोल जाधव हे फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत गुन्हा क्रमांक ७४३/२०२६, ७४४/२०२६ व ७४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

