प्रवरा नदीपात्रातून वाळू चोरी करणाऱ्या दोघांना पकडले !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत टेम्पोसह एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रणजीत जाधव तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आर. डी. ढोकणे व विनोद उंडे हे श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पंचांसमक्ष प्रवरा नदीपात्राजवळ जाऊन पाहणी केली असता टेम्पोमधून वाळू घेऊन येणाऱ्या वाहनास अडवून तपासणी करण्यात आली. या कारवाईत रोहित बाळासाहेब राऊत (वय २६) आणि अभिजीत बाळासाहेब राऊत (वय २४), दोघेही रा. भेर्डापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्या ताब्यातून ५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा विनाक्रमांकाचा टेम्पो आणि १० हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) सह पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ३, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे करीत आहे.
