संगमनेर येथे गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव उधळला ; ११ जनावरांची सुटका

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; १ लाख ७० हजार रुपयांची जनावरे ताब्यात

संगमनेर / प्रतिनिधी :

संगमनेर शहरातील रहेमतनगरजवळ आर. के. प्लॉटिंगच्या बाजूला काटवनात कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली. या जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ७० हजार रुपये आहे.

१७ ऑगस्ट रोजी पथक संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना रहेमतनगरजवळील आर. के. प्लॉटिंगच्या बाजूला काटवनात काही गोवंशीय जनावरे चारा-पाण्याशिवाय बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ११ लहान-मोठी गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचे आढळून आले.

पथकाने घटनास्थळावरून १ लाख ७० हजार रुपये किमतीची ११ गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली. जनावरांच्या मालकाबाबत परिसरातील नागरिकांकडे विचारपूस केली असता कोणतीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. जनावरांच्या मालकाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७८९/२०२६ नुसार महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ मधील सुधारित २०१५ चे कलम ५ (अ)(ब), ९ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याबाबतच्या कलम ३ व ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!