वैदवाडीत अवैध मावा बनवणाऱ्यावर एलसीबीची कारवाई ; १ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
सावेडी परिसरातील वैदवाडी येथे अवैधरीत्या मावा तयार करून विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक मशीनसह एकूण १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पथक तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना वैदवाडी येथील लोखंडी चाळ परिसरात मावा तयार करून विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष मातोश्री किराणा स्टोअरजवळील पत्र्याच्या खोलीत छापा टाकला. यावेळी बबन रामा लोखंडे (वय ३२, रा. लोखंडी चाळ, वैदवाडी, सावेडी, अहिल्यानगर) हा इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना आढळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपये किमतीचे मावा तयार करण्याचे इलेक्ट्रिक मशीन, १० हजार रुपये किमतीचा ५ किलो तयार मावा तसेच १४ हजार रुपये किमतीचा २० किलो सुगंधित तंबाखूमिश्रित सुपारी चुरा व छोट्या प्लॅस्टिक पुड्या, असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मावा तयार करण्यासाठी लागणारी सुगंधित तंबाखू व सुपारी ‘मेहराज’ (पूर्ण नाव माहित नाही, रा. मुकुंदनगर, ता. अहिल्यानगर) हा पुरवठा करत असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली असून तो फरार आहे.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
