जनधन खात्यातील ६० हजारांची फसवणूक ; ग्राहक सेवा केंद्र चालक गणेश दुधवडे याच्याविरुद्ध गुन्हा !

संगमनेर / प्रतिनिधी

जनधन खात्यातील रक्कम बँक खात्यावर वर्ग करण्याच्या बहाण्याने खात्यातील पैसे परस्पर वर्ग करून फसवणूक केल्याप्रकरणी गणेश लक्ष्मण दुधवडे, (रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुरलीधर महादू साबळे (वय ६५, व्यवसाय शेती, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी मुरलीधर साबळे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया, संगमनेर शाखेतील जनधन योजनेचे खाते असून नांदुरी दुमाला येथे बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आहे. या केंद्राचा चालक म्हणून गणेश लक्ष्मण दुधवडे कामकाज पाहतो.

फिर्यादीच्या खात्यामध्ये दिनांक २२/०९/२०२३ पर्यंत जमिनीच्या व्यवहारातून ८ लाख रुपये जमा झाले होते. त्यानंतर दिनांक २८/०९/२०२३ रोजी गणेश दुधवडे याने फोन करून जनधन खात्यात एवढी रक्कम ठेवता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पैसे काढून ॲक्सिस बँक शाखा, संगमनेर येथे भरावे लागतील, असे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्याच्यावर विश्वास ठेवून पैसे ट्रान्सफर करण्यास होकार दिल्यानंतर गणेश दुधवडे फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन त्यांच्या समोर बँकेच्या शाखेत एक रुपया वर्ग केला. बाकीचे पैसे नंतर वर्ग करतो, असे सांगून तो निघून गेला.

त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर ३० हजार रुपये व ३० हजार रुपये असे एकूण ६० हजार रुपये बँकेच्या खात्यावर ट्रान्सफर न होता, त्यापैकी ३० हजार रुपये गणेश दुधवडे याच्या खात्यावर आणि ३० हजार रुपये तो चालवत असलेल्या ग्राहक सेवा केंद्रातील फिनो टेक्नॉलॉजीच्या खात्यावर जमा झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर दिनांक ३०/०९/२०२३ रोजी फिर्यादीने गणेश दुधवडे याची प्रत्यक्ष भेट घेऊन पोलिसांत तक्रार करण्याचे सांगितले. त्यावेळी त्याने फिर्यादीच्या खात्यावर ६० हजार रुपये जमा केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

गणेश दुधवडे याने दिशाभूल करून स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीच्या खात्यातील ६० हजार रुपये त्याच्या खात्यावर वर्ग करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

त्यानंतर दिनांक ०६/१०/२०२३ रोजी फिर्यादी ग्राहक सेवा केंद्रात रक्कम वर्ग करण्यासाठी गेले असता, गणेश दुधवडे याने काहीही न विचारता फिर्यादीच्या खात्यावरील ३० हजार रुपये स्वतःच्या खात्यावर वर्ग करून फिर्यादीची व इतर लोकांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सदर रक्कम अद्याप परत दिलेली नसल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!