दिव्यांग बांधवांना रेशन दुकानात रांगेत उभे न करता थेट धान्य द्या ; आमदार खताळ यांच्या पुरवठा विभागाला सक्त सूचना !
संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेताना यापुढे रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज भासणार नाही. दिव्यांगांना रेशन वितरणात प्राधान्य देण्याबाबत तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांबाहेर सूचना फलक लावावेत, असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ पाटील यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दैनंदिन जीवनात विविध अडचणींचा सामना करणाऱ्या दिव्यांग बांधवांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन घेताना रांगेत उभे राहावे लागत असल्याने मोठा शारीरिक त्रास सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन ‘दिव्यांग सारथी संघटने’च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांची भेट घेत रेशन वितरणात दिव्यांगांना प्राधान्य देण्याची मागणी केली.

या मागणीची अत्यंत संवेदनशीलतेने आणि तातडीने दखल घेत आमदार खताळ पाटील यांनी जागेवरूनच पुरवठा अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानाबाहेर “दिव्यांग बांधवांना रेशन वितरणात प्राधान्य दिले जाईल” असा स्पष्ट उल्लेख असलेले फलक लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आमदारांच्या या तत्परतेबद्दल दिव्यांग सारथी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि दिव्यांग बांधवांनी त्यांचे आभार मानत निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेकडो दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना सध्या दरमहा अडीच हजार रुपये मानधन मिळते. वाढती महागाई पाहता ही रक्कम प्रतिमहिना ६ हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे आमदार खताळ यांच्याकडे केली आहे.
दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती, आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध व्हावे, यासाठी संगमनेरमध्ये ‘दिव्यांग भवन’ तातडीने सुरू करण्यात यावे, अशी आग्रही मागणीही दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने करण्यात आली.



