बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून मृत्यू..

कृष्णा पवार कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार – आमदार अमोल खताळ

संगमनेर/प्रतिनिधी :

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे शेततळ्यात पाय घसरून कृष्णा वसंत पवार (वय १२) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार (दि. २९) रोजी घडली. कृष्णा हा बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडल्याचे त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी आमदार खताळ म्हणाले, “कृष्णाच्या मृत्यूची घटना अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे. एका निष्पाप बालकाच्या दुर्दैवी मृत्यूने पवार कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले आहे. या दुःखाच्या प्रसंगी आपण पवार कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जाईल.”

बिबट्याच्या वावराचा मुद्दा ऐरणीवर

कृष्णाच्या मृत्यूनंतर परिसरातील बिबट्यांच्या वावराचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. मानवी वस्त्यांच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नम्रता हिरे, पोलीस उपनिरीक्षक विकास काळे, महायुतीचे रविंद्र देशमुख, रोहिदास साबळे, सुनील देशमुख, कैलास अडभाई, श्रीकांत कडलग, सुदर्शन देशमुख, विक्रांत वैभव नाईकवाडी, अरुण देशमुख, विनोद सुर्वे, संजय देशमुख, सुरेश कडलग, सुशांत कडलग, सुभाष कडलग, महेश सुर्वे, संभाजी कडलग यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बिबट्याच्या वावराबाबत अधिकाऱ्यांना सूचना

“कृष्णा हा बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडल्याचे पवार कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर घटनेची वस्तुस्थिती समोर येण्यासाठी अधिक तपास करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मानवी वस्त्यांच्या परिसरात बिबट्यांचा वावर आढळून येत असल्यास वनविभागाने केवळ पाहणी न करता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी बिबट्यांचा वारंवार वावर आढळतो, त्या ठिकाणी पाहणी करून आवश्यकतेनुसार पिंजरे लावावेत. तसेच बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नियमानुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.” अमोल खताळ, आमदार

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!