बिबट्याच्या भीतीने पळताना शेततळ्यात पडून ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
जवळे कडलग येथे हृदयद्रावक घटना ; शिवछत्रपती ERT टीमच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या शोधमोहीमेनंतर मृतदेह बाहेर काढला
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना पाय घसरून शेततळ्यात पडल्याने ११ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा वसंत पवार हा ११ वर्षीय मुलगा बिबट्याच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी धावत होता. यावेळी त्याचा शेततळ्याजवळ पाय घसरला आणि तो पाण्यात पडून बुडाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
मुलाचा शोध घेण्यासाठी शिवछत्रपती ERT टीमचे जवान नवनाथ सिनारे आणि प्रशांत पांडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न केल्यानंतर जवानांना कृष्णाचा मृतदेह शोधण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी येथे पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे जवळे कडलग परिसरात शोककळा पसरली आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये आधीपासूनच भीतीचे वातावरण असून, या घटनेनंतर वनविभागाने परिसराची तातडीने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
