दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा महोत्सवाच्या २५ कोटींच्या निविदेला काँग्रेसचा विरोध

उत्सवापेक्षा शेतकऱ्यांच्या सिंचनाला आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या चार दिवसीय महोत्सवासाठी जलसंपदा विभागाने काढलेल्या २५ कोटी रुपयांच्या अंदाजित निविदेवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाई असताना अशा भव्य कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणे योग्य नसल्याची भूमिका काँग्रेसने मांडली आहे.

जलसंपदा विभागाच्या प्रस्तावित नियोजनानुसार, या शताब्दी महोत्सवासाठी ८ एकर जागेवर चार दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या खर्चाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.

काँग्रेसच्या मते, सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा संकटाच्या काळात सरकारी निधीचा वापर उत्सवांवर करण्याऐवजी पाण्याचे योग्य नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांवर करणे गरजेचे आहे.

धरणांचा खरा सन्मान भव्य सोहळ्यांच्या माध्यमातून नव्हे, तर शेतातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवून आणि नागरिकांची तहान भागवून होतो, असे काँग्रेसने नमूद केले आहे. त्यामुळे या २५ कोटी रुपयांच्या खर्चाचे नेमके नियोजन, तपशील आणि या आयोजनाची सार्वजनिक उपयोगिता सरकारने जनतेसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!