आधुनिक मत्स्यपालन व्यवसायाची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती ; जोर्वे येथील प्रकल्पाला कृषी विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट
संगमनेर प्रतिनिधी :
कृषी अभ्यास कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील यशस्वी कृषीपूरक व्यवसायांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथील बी.एस्सी. कृषीच्या विद्यार्थ्यांनी जोर्वे (ता. संगमनेर) येथील ‘कामिक आधुनिक मत्स्य संवर्धन प्रकल्पाला’ क्षेत्रभेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, व्यवसाय व्यवस्थापन आणि मत्स्यपालनातून उपलब्ध होणाऱ्या आर्थिक व स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती घेतली.
या प्रकल्पाशी संबंधित अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेले कपिल दिघे व सारंग दिघे या बंधूंनी विद्यार्थ्यांना मत्स्यपालन व्यवसायाचे सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मत्स्यबीज उत्पादन, मत्स्यपालन तलावांचे व्यवस्थापन, विविध माशांच्या जाती, खाद्य व्यवस्थापन, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, मत्स्यरोग नियंत्रण तसेच माशांची काढणी आणि विक्री या प्रक्रियांची माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मत्स्यपालनातील तांत्रिक बाबीही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच आधुनिक मत्स्यपालन व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यव्यवसाय अधिक शास्त्रीय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा करता येतो, याची माहिती त्यांना मिळाली. मत्स्यपालन हा शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय, तर ग्रामीण भागातील युवकांसाठी स्वयंरोजगाराचे प्रभावी साधन ठरू शकतो, याची जाणीवही विद्यार्थ्यांना झाली. उत्पादनापासून ते बाजारपेठेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्यावहारिक ज्ञान या भेटीतून मिळाले.

या क्षेत्रभेटीत साहिल लहांगे, चैतन्य नवले, करण पटारे, प्रदीप रंधे, मोहित शिंदे आणि रोहित यादव या सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कृषी अभ्यास कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील यशस्वी कृषीपूरक व्यवसायांचा अभ्यास करण्याची आणि आधुनिक मत्स्यपालनातील रोजगार व व्यवसायाच्या संधी समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
हा कृषी अभ्यास कार्यानुभव कार्यक्रम माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी संस्थेच्या सचिव शरयूताई देशमुख आणि मुख्य प्रशासक श्री. निंबाळकर यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रा. जी. बी. बाचकर, शैक्षणिक प्रमुख प्रा. रवींद्र दसपुते, ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम अधिकारी डॉ. साजन हिंगोणेकर यांच्यासह इतर प्राध्यापक व विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.

