संगमनेरच्या वीज समस्यांवर तोडगा काढा ; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची आमदार खताळांची  ऊर्जा राज्य मंत्र्यांकडे मागणी 

संगमनेर / प्रतिनिधी

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील यांनी मंत्रालयात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तालुक्यातील मेंढवन येथे मंजूर असलेल्या वीज उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी यावेळी केली.

संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांवर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृषी पंपांचा अनियमित वीजपुरवठा, वारंवार नादुरुस्त होणारे रोहित्र आणि नवीन रोहित्र वेळेवर उपलब्ध न होणे, यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्याची गरज आमदार खताळ यांनी राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

तालुक्यातील मेंढवन येथे मंजूर असलेल्या वीज उपकेंद्राचे काम लवकर सुरू झाल्यास परिसरातील गावांच्या वीजपुरवठ्यात सुधारणा होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच नादुरुस्त रोहित्र त्वरित बदलणे आणि आवश्यक ठिकाणी नवीन रोहित्र उपलब्ध करून देण्याची मागणीही केली.

शेतकऱ्यांना वीजेअभावी शेतीच्या कामांत अडथळे येऊ नयेत आणि नागरिकांना नियमित वीजपुरवठा मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणेने प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा आमदार खताळ यांनी व्यक्त केली. संगमनेर मतदारसंघातील वीज समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!