दुष्काळाचे संकट दूर होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा सुखाचे दिवस येऊ दे..! 

आमदार अमोल खताळ यांची बिरोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना

संगमनेर (प्रतिनिधी) – 

सध्या शेतकरी राजा दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहे. हे संकट लवकरात लवकर दूर होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा सुखाचे दिवस यावेत, त्यांच्या कष्टाला चांगले फळ मिळावे आणि शेतीत समृद्धी नांदावी, अशी भावपूर्ण प्रार्थना आमदार अमोल खताळ यांनी धांदरफळ खुर्द येथील बिरोबा महाराजांच्या चरणी केली.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे बिरोबा महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्या विकास निधीतून सुमारे १५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण आमदार खताळ आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

यात्रेच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने रस्त्याची आवश्यकता लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यात आले होते. या रस्त्यामुळे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार असून गावाच्या पायाभूत सुविधांमध्येही भर पडली आहे. अल्पावधीत काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, गावातून निघणाऱ्या मानाच्या काठीची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर डफ आणि विविध वाद्यांच्या गजरात मानाच्या काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गुलाल आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. ‘बिरोबा महाराज की जय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

या मिरवणुकीत आमदार अमोल खताळ यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. मानाच्या काठीसोबत मिरवणुकीत सहभागी होत त्यांनी काठी नाचविण्याचा आनंद घेतला. यावेळी यात्रेचा धार्मिक उत्साह आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या शेवटी बिरोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार अमोल खताळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी धांदरफळ खुर्द येथील ग्रामस्थ, भाविक तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!