ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनासाठी समाजात जागृती आवश्यक – जंजिरे

धर्मवीर गडाच्या इतिहासावर लेखिका काजल जंजिरे यांचे माहितीपूर्ण पुस्तक प्रकाशित

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क :

ऐतिहासिक वारसा जतन करणे म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचे संरक्षण करणे नव्हे, तर त्यांच्याशी निगडित सत्य, स्मृती आणि सांस्कृतिक संदर्भांचे जतन करणे होय. ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या संवर्धनाविषयी समाजात व्यापक जागृती निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लेखिका व प्रसिद्ध वास्तुविशारद काजल महेश जंजिरे यांनी केले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गडाच्या इतिहासावर आधारित काजल जंजिरे यांनी लिहिलेल्या माहितीपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते धर्मवीर गड परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

पेडगावच्या रहिवासी असलेल्या काजल जंजिरे यांनी पुस्तक निर्मितीमागील संशोधन, अभ्यास आणि लेखनप्रक्रियेचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे विविध पैलू आणि धर्मवीर गडाचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय राखीव पोलीस दलात सहाय्यक कमांडंट पदावर कार्यरत असलेले पती महेश ईश्वर जंजिरे यांचे प्रोत्साहन व सहकार्य, तसेच सासू-सासरे आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळेच पुस्तकनिर्मिती शक्य झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि आमदार हेमंत ओगले यांनी लेखिका जंजिरे यांच्या कार्याचे कौतुक केले. धर्मवीर गडाच्या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि पेडगावच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व राज्यातील विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व आमदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार ओगले यांनी सांगितले.

काष्टी गावची कन्या असलेल्या काजल जंजिरे या सिद्धहस्त लेखिका, अभ्यासू संशोधक आणि उत्कृष्ट वास्तुविशारद असल्याचा अभिमान असल्याचे आमदार पाचपुते यांनी गौरवोद्गार काढताना सांगितले. धर्मवीर गडाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पुढाकार घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

कार्यक्रमात ज्येष्ठ नेते ॲड. डी. डी. घोरपडे, इतिहासकार प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय अध्यक्ष जयंत येलूलकर, कवी चंद्रकांत पालवे, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, निवृत्त आयपीएस अधिकारी हेमंतराजे गायकवाड आणि पेडगावचे सरपंच इरफानभाई पिरजादे यांनी मनोगत व्यक्त केले.

गणराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. डॉ. बाळासाहेब बोठेपाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाच्या निर्मितीमध्ये गणराज प्रकाशनाचे संचालक प्रा. गणेश भगत, क्रिएटिव्ह कम्युनिकेशन्सचे संचालक व ज्येष्ठ संपादक जयंतराव देशपांडे आणि गणेश मुद्रणालयाचे संचालक गणेशसेठ दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे लेखिका जंजिरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. डॉ. बाळासाहेब बोठेपाटील यांनी केले. लेखिका काजल जंजिरे यांचे सासरे ईश्वर जंजिरे, सासू सुनीता जंजिरे, वडील सुनील दरेकर, आई अश्विनी दरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जंजिरे आणि युवा नेते महेश दरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पत्रकार विशाल चव्हाण यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले, तर प्रा. डॉ. गणेश भगत यांनी आभार मानले.

या प्रकाशन सोहळ्यास राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह महेश जंजिरे यांचे विविध शासकीय विभागांतील अधिकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी सुमारे ९० एकर परिसरात विस्तारलेल्या धर्मवीर गडावरील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरांची पाहणी करून या ऐतिहासिक ठेव्याची माहिती जाणून घेतली.

ऐतिहासिक वारशाचे दस्तऐवजीकरण, संशोधन आणि संवर्धन यांचा सुंदर संगम घडविणारे काजल जंजिरे यांचे हे पुस्तक धर्मवीर गडाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!