संगमनेर दूध संघाच्या चेअरमनपदी रमेश गुंजाळ यांची निवड !

संगमनेर (प्रतिनिधी) : 

संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या (राजहंस दूध संघ) चेअरमनपदी रमेश लहानुभाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देत राज्यात लौकिक मिळवलेल्या राजहंस दूध संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आता रमेश गुंजाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

राजहंस दूध संघाच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाचे संतोष कोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया झाली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालकपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर रणजितसिंह देशमुख यांनी दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

विशेष सभेत चेअरमनपदासाठी ज्येष्ठ संचालक संतोष निवृत्ती मांडेकर यांनी रमेश गुंजाळ यांच्या नावाची सूचना मांडली. त्यास विक्रम शिवाजीराव थोरात यांनी अनुमोदन दिले. या पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कोरे यांनी रमेश लहानुभाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यानंतर नवनिर्वाचित चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्हाइस चेअरमन राजेंद्र पा. चकोर, ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे, विलासराव वर्षे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, भारत मुंगसे, प्रमोद पावसे, प्रतिभाताई जोंधळे, मंदाताई नवले तसेच कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते.

या निवडीबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, एकविरा फाऊंडेशनच्या संस्थापक तथा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, रणजितसिंह देशमुख, दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, पांडुरंग पाटील घुले, ॲड. माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, आर. बी. राहाणे, बाजीराव पा. खेमनर, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, लहानुभाऊ गुंजाळ, गणपतराव सांगळे, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

राजहंस दूध संघाचा लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार – रमेश गुंजाळ

थोर स्वातंत्र्यसेनानी आणि सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी १९७७ साली राजहंस दूध संघाची स्थापना केली. माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात आणि जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. या संघाचा लौकिक कायम ठेवत संचालक मंडळाला सोबत घेऊन सर्वसामान्य शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित चेअरमन रमेश गुंजाळ यांनी दिली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!