देश वाचवायचा असेल तर सत्यशोधक विचार आणि संविधानाची मूल्ये जपली पाहिजेत !

माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

देशाला टिकवायचे असेल, लोकशाही अधिक सामर्थ्यवान बनवायची असेल, तर सत्यशोधक विचारांशिवाय दुसरा पर्याय नाही. भारतीय राज्यघटनेने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये केवळ बोलण्यापुरती न ठेवता प्रत्येकाने आपल्या आचरणात आणली पाहिजेत. अन्यथा येणारी पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही, असे परखड प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान, ओतूर यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त ऐतिहासिक शाळेचा वारसा लाभलेल्या ओतूर येथे महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात संवाद साधताना थोरात यांनी सत्यशोधक विचार, पुरोगामी चळवळ, सामाजिक समता आणि संविधानाच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सत्यशील शेलकर, दिलीप ढेमढेरे, संजय काळे, विशाल तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, महात्मा फुले यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजात रुजविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संतपरंपरेने दिलेला मानवतावादी विचार हाच समाजाला एकत्र ठेवणारा विचार आहे. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान आणि भारतीय राज्यघटनेचा मूलभूत विचार एकच असून, मानवता हाच खरा धर्म मानण्याची शिकवण आपल्या संतांनी दिली आहे. वारकरी संप्रदायानेही सर्व जाती-धर्मांना एकत्र आणत समतेचा संदेश दिला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या पुरोगामी विचारांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून घटनात्मक अधिष्ठान दिले. प्रबोधनकार ठाकरे यांनीही पुरोगामी विचारांसाठी मोठा संघर्ष केला. हा संघर्ष आजही संपलेला नसून तो पुढेही अधिक ताकदीने सुरू ठेवावा लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजची जेन झी पिढी जात, धर्म आणि पंथाच्या भिंती मानण्यास तयार नाही. राजकारणासाठी धर्म आणि जातीचा वापर केला जात असताना, आमच्या भविष्याचे काय, असा थेट सवाल ही तरुण पिढी विचारत आहे. हीच निकोप लोकशाहीची खरी भावना असून सत्यशोधक विचार हाच लोकशाहीचा भक्कम आधार आहे, असे थोरात म्हणाले.

महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला झालेला विरोध हा केवळ एका चित्रपटाला नव्हता, तर महात्मा फुले यांच्या पुरोगामी विचारांना विरोध होता. आज हा विचार धोक्यात आणण्याचे प्रयत्न होत असून, अशा परिस्थितीत समाजाने एकजुटीने हा विचार अधिक ताकदीने जपण्याची गरज आहे. खासदार अमोल कोल्हे आपल्या मालिकांच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

ओतूर गावाने नेहमीच पुरोगामी विचारांची परंपरा जपली आहे. भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करण्याची संधी या अधिवेशनातून मिळाली. यापूर्वी २०१० मध्येही ओतूर येथे सत्यशोधक अधिवेशन झाले होते. या ऐतिहासिक परंपरेला पुढे नेण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

या अधिवेशनाची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. देश वाचवायचा असेल, लोकशाही टिकवायची असेल, तर भारतीय संविधानाचे संरक्षण प्राणांपेक्षाही अधिक महत्त्वाचे मानले पाहिजे. सत्यशोधक विचारांचा जागर असाच अखंड सुरू राहिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!