संगमनेरातील जुगार अड्ड्यांना कोणाचा कृपाशीर्वाद ?
जिल्ह्यात धडाकेबाज कारवाया, मग संगमनेरच का वगळले ?
संगमनेर प्रतिनिधी –
अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला जुगार अड्डे सहज सापडतात आणि तिथे धडाकेबाज कारवायाही होतात; मात्र संगमनेर शहर आणि तालुक्यातील जुगार अड्डे एलसीबीच्या पथकाला का दिसत नाहीत? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. एलसीबीच्या या दुजाभावाच्या भूमिकेमुळे संगमनेरातील अवैध धंद्यांना कोणाचे पाठबळ आहे आणि यामागे नेमका कोणता ‘अर्थपूर्ण’ गडबड घोटाळा सुरू आहे, अशी जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.
सध्या संगमनेर शहर आणि तालुक्याची ओळख ‘अवैध धंद्यांचे शहर’ अशी बनली आहे. शहरात आणि ग्रामीण भागात कायद्याचा धाक उरला नसून सर्वच प्रकारचे अवैध धंदे बिनदिक्कतपणे सुरू आहेत शहरातील पारंपरिक जुगार अड्डे चालवणाऱ्या ‘जुगार किंग’ मंडळींनी पुन्हा एकदा एकत्र येत शहरात जोमाने जुगार अड्डे सुरू केले आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून भरचौकात हे अड्डे सुरू असूनही कोणतीही कारवाई होत नाही.

केवळ शहरच नव्हे तर घारगाव, आश्वी, तळेगाव, साकूर पठार भाग आणि पुणे-नाशिक महामार्गावरील काही ढाबे व हॉटेल्समध्ये जुगार अड्डे सर्रासपणे चालवले जात आहेत. तालुक्यात अवैध देशी-विदेशी दारूची विक्री आणि वाहतूक जोरात सुरू आहे. यासोबतच आळेफाटा परिसरातून संगमनेरच्या दिशेने गांजा व इतर अमली पदार्थांची अवैध तस्करी होत असल्याचे नेहमीच बोलले जाते. गुटखा आणि अवैध कत्तलखान्यांचे प्रकारही नित्याचेच झाले आहेत.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यासह घारगाव, आश्वी आणि संगमनेर तालुका पोलीस स्टेशन यांचे आणि अवैध धंदे करणाऱ्यांचे साटे लोटे झाले आहे की काय ? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. अधून मधून ॲक्शन मोड मध्ये असलेल्या पोलीस उपअधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकांना देखील जुगाराचे अड्डे सापडत नाहीत हेही आश्चर्यच म्हणावे लागेल.

एलसीबीच्या पथकाकडून संगमनेरमध्ये केवळ कत्तलखान्यांवर कारवाई केली जाते, मात्र जुगार अड्ड्यांना पूर्णपणे अभय दिले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये जुगारांवर धाडी पडत असताना संगमनेरवरच एलसीबीचा एवढा ‘कृपाशीर्वाद’ का, याबद्दल सामान्य नागरिकांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संगमनेरातील या ‘जुगार किंग’ मंडळींच्या मुसक्या आवळणार की एलसीबीकडून त्यांना असेच कायमस्वरूपी अभय मिळत राहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
