कार्यकर्ते कोर्टाच्या चकरा मारतायत, नेत्यांच्या मात्र ‘स्वार्थाच्या पोळ्या’ भाजल्या जातायत ; संगमनेर मध्ये ‘परिवर्तनाच्या’ ठिणग्या !
सत्तेच्या मलिद्यासाठी थोरात – विखेंची सेटलमेंट !
विशेष प्रतिनिधी –
राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याचा प्रत्यय अहिल्यानगर जिल्हा आणि विशेषतः संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा आला आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणारे, हाणामाऱ्यांचे शस्त्र उपसणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे सत्ता आणि सहकाराच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले. या राजकीय ‘सेटलमेंट’ वरून आता सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समविचारी पक्षांमध्ये प्रचंड संतापाचा वणवा पेटला असून, “सत्तेचा मलिदा वाटून घेण्यासाठीच हा खटाटोप सुरू असून, अशा स्वार्थी राजकारण्यांवर सर्व सत्तांचे ‘परिवर्तन’ हाच एकमेव जालीम उपाय आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
“आम्ही काय आता एकमेकांच्या विरोधात तलवारी उपसून रस्त्यावर यायचे का” असा सवाल आपल्या राजकीय भाषणातून करणारे माजी खासदार आणि जिल्हा बँकेचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जनतेसमोर उपस्थित केला होता. “तुम्ही कधी तलवारी उपसल्या ? कार्यकर्ते आणि पदाधिकारी तलवारी उपसून हाणामाऱ्या, जाळपोळ करून तुरुंगात गेले. अनेक गुन्हे दाखल झाले. त्यांच्या कोर्टकचेऱ्या चालू आहेत. तुम्ही मात्र सत्तेच्या खुर्च्या उबवत बसले आहात.” अशा संतप्त प्रतिक्रिया डॉक्टर विखे यांच्या वरील सवालाला उत्तर म्हणून जनतेतून मिळत आहेत.

‘सतरंज्या’ कार्यकर्त्यांच्या, खुर्च्या मात्र ‘सोयऱ्यांच्या’ ?
सहकारातील निवडणुकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील या दोन दिग्गज घराण्यांनी सत्तेची गणिते जुळवून घेतली आहेत. ‘राजकीय सेटलमेंट’ मधून सत्तेचे लाभ स्वतःकडे आणि आपल्या जवळच्या लोकांकडे ठेवण्यासाठी हे मनोमिलन घडवून आणले गेल्याचे समोर आले आहे, असे जाणकार सांगतात. “सगे सोयरे आणि भाऊबंद सत्तेच्या खुर्च्यांवर बसवायचे आणि सामान्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मात्र पारंपारिक सतरंज्या उचलण्याच्या कामावरच कायम ठेवायचे,” असाच प्रकार सातत्याने सुरू असल्याची उघड चर्चा आता रंगू लागली आहे.
हाणामाऱ्या कार्यकर्त्यांनी करायच्या, गुन्हे अंगावर घ्यायचे अन् नेते एकत्र ?
काही महिन्यांपूर्वीपर्यंत विखे आणि थोरात यांच्यातील संघर्ष म्हणजेच जिल्ह्याचे राजकारण मानले जात होते. या संघर्षाच्या झळा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वाधिक बसल्या. नेत्यांच्या सांगण्यावरून प्रसंगी अंगावर गुन्हे दाखल करून घेणारे, एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरून हाणामाऱ्या करणारे कार्यकर्ते आजही न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र, ज्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले, तेच नेते सत्तेसाठी एकत्र आल्याने कार्यकर्त्यांच्या भावनांचा अक्षरशः कडेलोट झाला आहे.

‘कमरेचे सोडून डोक्याला बांधले’ ; समविचारी पक्षांत खदखद
राजकीय दुकानदारी अबाधित ठेवण्यासाठीच दोन्ही घराण्यांनी हात मिळवणी केल्याचा आरोप होत असून, यावर सोशल मीडियावरूनही तिखट प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस, भाजप या दोन पक्षांना सहकार्य करणारे समविचारी पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि नेते या घडामोडींमुळे अस्वस्थ आहेत. “या दोन घराण्यांच्या राजकीय लढाईत आमचा बळी दिला गेला आहे. राजकीय वापर देखील करण्यात आला आहे. आम्ही आमच्या तत्वांवर ठाम असलो, तरी नेत्यांनी मात्र सोयीचे राजकारण करत ‘कमरेचे सोडून डोक्याला बांधण्याचा’ प्रकार केला आहे,” अशा संतप्त भावना व्यक्त होत आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी पुढील निवडणुकात वेगळा पवित्रा घेण्याचा इशारा देखील दिला आहे.
माजी आमदार डॉक्टर तांबेंची राजकीय ससेहोलपट ; ‘थोरात-विखेच पक्ष’ अशी चर्चा
या संपूर्ण राजकीय नाट्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे व विधानपरिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि तांबे परिवाराची भूमिकाही चर्चेचा विषय ठरली आहे. आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी सत्यजित तांबे भाजपकडे संधान साधत असल्याचे आरोप होतात. दुसरीकडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुलाच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी विनाकारण ससेहोलपट होत असून, त्यांनी स्वतःचे पुरोगामी विचार बाजूला ठेवले आहेत का, अशी शंका नागरिकांतून उपस्थित केली जात आहे.
‘कार्यकर्ते या सेटलमेंट मुळे खुश आणि समाधानी आहेत असे नेत्यांकडून सांगितले जात असले तरी, ते कार्यकर्ते नसून निव्वळ लाभार्थी आहेत’ त्यांचा धंदाच लाभ मिळवणे असून त्यांच्या ‘निष्ठा या विष्ठा’ असल्याची तीव्र टीका जनतेमधून करण्यात येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात या नेत्यांनी स्वतःचे राजकीय पक्ष वाढवले नाहीत, तर ‘थोरात आणि विखे हेच पक्ष आहेत’, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा आहे. स्वार्थी राजकारणासाठी कार्यकर्ते आणि मतदारांनी स्वतःच्या विचारांचा आणि नातेसंबंधांचा किती बळी द्यायचा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आगामी प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी ‘परिवर्तनाचा’ डोस देत या प्रवृत्तीला लगाम घालावा, असा सूर आता सर्वसामान्य जनतेतून जोर धरू लागला आहे.
