संगमनेर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची पलटी : कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा अधिकृत लोकार्पण सोहळा झालाच नाही !
मग ‘त्या’ कार्यक्रमात “सीओ बाहुला” म्हणून मिरवत होते का नागरिकांचा सवाल
संगमनेर प्रतिनिधी –
संगमनेर नगरपरिषदेच्या कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या नुकत्याच पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याने आता नाट्यमय वळण घेतले आहे. हा लोकार्पण सोहळा अधिकृत नव्हता, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्याने पालिकेच्या कारभाराचा सावळा गोंधळ उघड झाला आहे. मुख्याधिकाऱ्यांचा या कार्यक्रमातला सहभाग कोणाच्या दबावाखाली होता ? कोणत्या मजबूरीतून हा कार्यक्रम घेण्यात आला, हे सर्व काही संशयास्पद असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात मुख्याधिकारी मात्र अगदी यजमानासारखे ‘नटून थटून’ मिरवत होते ते कशासाठी—अर्थात ते त्या कार्यक्रमात केवळ ‘बाहुला’ म्हणून मिरवत होते का, असा सवाल आता जनतेने उपस्थित केला आहे.
संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आधुनिक आणि अद्ययावत कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे अधिकृत लोकार्पण अद्याप झालेले नाही. २३ व २४ नोव्हेंबर २०२६ रोजी नाट्यगृहात पार पडलेला कार्यक्रम हा जयहिंद लोक चळवळ संस्थेने आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा नगरपरिषदेशी कोणताही अधिकृत संबंध नव्हता, असे स्पष्ट करत मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नाट्यगृहाच्या लोकार्पणाबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, ‘त्या’ लोकार्पण सोहळ्याला स्वतः मुख्याधिकारी हजर असताना आणि राजकीय नेत्यांनी लोकार्पणाची घोषणा केल्यानंतर आता अचानक घेतलेली ही ‘पलटी’ अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. शिवाय या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकांवर मुख्याधिकाऱ्यांचे नाव, नगरपालिकेचा लोगो आणि विकण्यात आलेली तिकिटे यावरही नगरपालिकेच्या बोधचिन्हाचा फोटो वापरण्यात आला होता. त्यावेळी मुख्याधिकारी झोपले होते का असाही सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
संगमनेरमधील नूतनीकरण करण्यात आलेल्या कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे लोकार्पण आणि दोन दिवसीय नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या साक्षीने अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध राजकीय क्षेत्रातील महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे, महापौर ज्योतीताई गाडे, धनश्री सुजय विखे पाटील (लोणी), शितल संग्राम जगताप (नगर), लेखिका शेफाली समीर भुजबळ (नाशिक), प्रियंका अक्षय कर्डिले (नगर), राणीताई निलेश लंके (पारनेर), सुनीता शंकरराव गडाख (नेवासा) डॉ. धनिषा ताई पानगव्हाणे (नाशिक), गीतांजली शेळके (महानगर बँक) अनुराधा नागवडे (श्रीगोंदा) संगीता वाघ (संचालक जिल्हा बँक), राहुरी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान, नंदुरबारचे मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह अनेक राजकीय नेते, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांकडून नाट्यगृहाचे लोकार्पण झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.

परंतु, या कार्यक्रमाला संगमनेरचे विद्यमान महायुतीचे आमदार अमोल खताळ यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याने शहरासह तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर नाट्यगृहाच्या लोकार्पणाबाबत नगरपरिषदेची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी ठराविक पत्रकारांना बोलावून पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेत गोरे यांनी सांगितले की, नाट्यगृहाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सन २०२४ मध्ये प्राप्त झालेल्या निधीतून निश्चित केलेली आतापर्यंतची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित कामांसाठी पुढील निधी प्राप्त झाल्यानंतर नाट्यगृहाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर नगरपरिषदेच्या वतीने अधिकृत लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येईल.
दरम्यान, कवी अनंत फंदी प्रतिष्ठानने २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२६ या कालावधीत व्याख्यानमालेसाठी नाट्यगृह उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यास नगरपरिषदेने परवानगी दिली आहे. तसेच जयहिंद लोकचळवळ संस्थेने २३ व २४ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी नाट्यगृह मिळावे, असा अर्ज केला होता. त्यानुसार संस्थेला केवळ दोन दिवस कार्यक्रम घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

त्यामुळे २३ व २४ नोव्हेंबर रोजी झालेला कार्यक्रम हा संबंधित संस्थेच्या आयोजनातून पार पडला असून, नगरपरिषदेच्या वतीने नाट्यगृहाच्या नवीन इमारतीचे कोणतेही अधिकृत उद्घाटन अथवा लोकार्पण करण्यात आलेले नाही, असे मुख्याधिकारी गोरे यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकारी खोटारडे आहेत
या कार्यक्रमा आधी नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले आहे का ? यासंदर्भात पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे का ? असे विचारले असता मुख्याधिकारी यांनी असा दाखला देण्याची गरज नाही असे सांगितले होते. मात्र आता ते म्हणतात काम अपूर्ण आहे. काम पूर्ण झाल्यावरच नाट्यगृहाचे अधिकृत लोकार्पण होणार आहे. मग अपूर्ण काम असतानाच नाट्यप्रयोग आणि लोकार्पण सोहळ्याला परवानगी देणारे मुख्याधिकारीच आहेत. मुख्याधिकाऱ्यांची भूमिका ही खोटारडेपणाची असल्याचे आरोप आता होत आहेत.
नाट्यगृहाच्या लोकार्पणावरून निर्माण झालेली राजकीय चर्चा, लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यावरून उपस्थित झालेले प्रश्न आणि नगरपरिषदेच्या अधिकृत भूमिकेबाबतचे संभ्रम या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणामुळे आता अधिकृत लोकार्पणासाठी नाट्यगृहाचे उर्वरित काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांची भूमिका नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर बदलली, याची चर्चा संगमनेरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाट्यगृहाचे काम पूर्ण नसताना अशा कार्यक्रमांना परवानग्या देणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवरच आता कारवाई व्हायला हवी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
