विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याने संगमनेर संतप्त ! थोरातांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा ; केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

“विद्यार्थ्यांच्या आवाजावर लाठ्या चालवणे ही हुकूमशाही !” — बाळासाहेब थोरात

संगमनेर | विशेष प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये बुधवारी संतप्त नागरिकांनी विराट मशाल मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात विविध पुरोगामी संघटना, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

मशालींच्या प्रकाशात संतापाचा उद्रेक

संगमनेर बसस्थानकापासून मशाल मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून चावडी मार्गे महात्मा फुले स्मारकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. सहभागी नागरिकांच्या हातात पेटत्या मशाली, तर घोषणांमधून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला. संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.

“लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू” — बाळासाहेब थोरात

सभेला संबोधित करताना बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

“विद्यार्थी, युवक आणि नागरिकांचा लोकशाही मार्गाने व्यक्त होणारा आवाज लाठ्यांच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलन करणाऱ्यांवर बलप्रयोग करणे ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब आहे. राज्यघटना, लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी तरुणांनी सजग राहिले पाहिजे.”

थोरात यांनी संसद, स्वायत्त संस्था, शिक्षण व्यवस्था आणि लोकशाही प्रक्रियेबाबतही केंद्र सरकारवर टीका करत सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

‘नीट’ प्रकरणावरून शिक्षण व्यवस्थेवर निशाणा

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी ‘नीट’ परीक्षेतील कथित अनियमिततेचा उल्लेख करत शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असताना त्यांच्यावर लाठीमार होणे ही गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.”

विविध पुरोगामी संघटनांचा सहभाग

या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (समविचारी), छात्र भारती, एनएसयूआय, जय हिंद लोक चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक समाज तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, सचिन गुजर, आजीज ओरा, अमोल बोराडे, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, अमोल शेलकर, ॲड. रंजना गवांदे, तुषार पानसरे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, अनुराधा आहेर, अरबाज शेख तसेच छात्र भारती आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!