अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
टेम्पोसह ८.१० लाखांचा मुद्देमाल जप्त ; एक आरोपी ताब्यात
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागलवाडी शिवारात सीना नदीपात्रात कारवाई करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून टेम्पो व वाळूसह एकूण ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिरजगाव परिसरात अवैध वाळू वाहतुकीची माहिती घेत असताना नागलवाडी गावच्या शिवारातील सीना नदीपात्रात टाटा कंपनीच्या टेम्पोमध्ये अवैधरीत्या वाळू भरली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीची खात्री करून पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला. यावेळी महेंद्र सदाशिव डाडर (वय ३८, रा. नागलवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हा टेम्पोमध्ये वाळू भरताना आढळून आला. वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले.

कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून ८ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा विनाक्रमांकाचा टेम्पो आणि १० हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३४७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरजगाव पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे व रोहित मिसाळ यांच्या पथकाने केली.
