मालुंजे : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या तस्करास पोलिसांनी पकडले !
विना नंबरच्या वाहनासह 3 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर प्रतिनिधी –
वाळू तस्करी आणि गौण खनिज अवैध उत्खननासाठी नेहमीच चर्चेत असलेले आणि प्रसिद्ध असलेल्या संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात वाळू तस्करी करणाऱ्या एका तस्कराला संगमनेर तालुका पोलिसांनी पकडले असून विना नंबरच्या वाहनातून चोरलेली वाळू वाहनासह जप्त करण्यात आली आहे.
मालुंजे गावातील या चोरीच्या प्रकरणाची नोंद संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात एकूण ३ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये ३ लाख किमतीची पांढऱ्या रंगाची, विना नंबरची टाटा कंपनीची गाडी तसेच ७ हजार किमतीची वाळू यांचा समावेश आहे.

६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मालुंजे गावात हा प्रकार घडला. त्यानंतर रात्री ११.२० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब केशव शिरसाट (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अजित साहेबराव हांडे (वय ३०, रा. रहिमपूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याचे नाव नोंदविण्यात आले आहे.
आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना व बेकायदा पद्धतीने टाटा कंपनीच्या वाहनातून वाळूची वाहतूक केली जात होती.
