संगमनेर येथे गोमांस विक्री : स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
4 आरोपी ताब्यात ; 1700 किलो गोमांससह 11.10 लाखांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर प्रतिनिधी –
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत 1700 किलो गोमांस आणि महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन असा एकूण 11 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, 5 सप्टेंबर 2026 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथकाला गोपनीय माहिती मिळाली. जमजम कॉलनी परिसरातील शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस पिकअप वाहनातून विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने पंचांसमक्ष सुकेवाडी ते समनापूर जाणाऱ्या रस्त्यालगत असिफ शेख यांच्या कांद्याच्या चाळीजवळ कारवाई केली.
या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन आढळून आले. वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये गोमांस आढळले. पोलिसांनी अब्दुलहमीद अहमद कुरेशी (23), कलामुद्दीन मिज्जन खान (28), वाहनचालक अरबाज फिरोज खान (24) आणि कैश शबनूर इनामदार (23) यांना ताब्यात घेतले.
कारवाईत 5 लाख 10 हजार रुपये किमतीचे 1700 किलो गोमांस तसेच 6 लाख रुपये किमतीचे महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन (क्रमांक एमएच-17-बीडी-4661) असा एकूण 11 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 839/2026 नुसार बीएनएस कलम 271, 325, 3(5) तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 मधील सुधारित 2015 च्या कलम 5(अ), 5(ब), 5(क) व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.
