संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा : माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर प्रतिनिधी :
मानवता धर्माला प्राधान्य देणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला दिशा दिली आहे. जात-पात, धर्म यापलीकडे जाऊन मानवता हाच खरा धर्म असून संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाच्या विचारांचा मोठा वारसा लाभला आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी, कवठे कमळेश्वर, कोकणगाव व जोर्वे येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध अखंड हरिनाम सप्ताहांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महिला व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांसारख्या संतांनी जातीभेदावर प्रहार करून मानवतेचा पुरस्कार केला. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हे विश्वाला शांती, समता आणि बंधुभावाचा संदेश देणारे आहे. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा विचार उत्तर भारतापर्यंत पोहोचविला.
महाराष्ट्राला भक्ती आणि अध्यात्माची समृद्ध परंपरा लाभली असून आषाढी वारी हे एकतेचे मोठे प्रतीक आहे. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात मोठ्या उत्साहाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. तालुक्याच्या विविध गावांमध्ये विकासकामांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला असून मानवतेचे कल्याण हाच राजकारणाचा आणि जीवनाचा सार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सातत्याने काम केले असून जनतेचे प्रेम व आशीर्वाद ऊर्जा देतात. प्रत्येकाने एकमेकांना मदत करून मानवता धर्म जपावा. संगमनेर तालुक्याला अध्यात्म आणि विकासाच्या माध्यमातून राज्यात अग्रगण्य बनविण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलो असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी हरिभक्त परायण मयुरी ताई शिंदे यांनी बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते असून थोरात परिवाराला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा लाभला आहे, असे सांगितले. गोरगरिबांची सेवा करण्याचे काम थोरात परिवाराने आयुष्यभर केले असून संगमनेर तालुका कृषी, सहकार, शिक्षण, व्यापार आणि आर्थिक समृद्धीसह बंधुभावाच्या वातावरणामुळे राज्यासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
