गणेशोत्सवासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करा – आमदार अमोल खताळ
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
संगमनेर / प्रतिनिधी :
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील विविध समस्या तातडीने मार्गी लावून उत्सव निर्विघ्न, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
गणेश मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या घेण्यासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी संगमनेर नगरपालिकेने तातडीने ‘एक खिडकी योजना’ सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सक्त सूचना त्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या.

यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात सोमवारी (दि. ३१) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत गणेशोत्सवाचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, रस्ते, वीजपुरवठा, कायदा व सुव्यवस्था तसेच गणेश मंडळांना आवश्यक परवानग्या यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
परवानग्यांसाठी एकाच ठिकाणी सुविधा
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांना विविध विभागांकडून परवानग्या घ्याव्या लागतात. यासाठी कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी नगरपालिकेने ‘एक खिडकी योजना’ सुरू करून गणेश मंडळांना आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात, असे आमदार खताळ यांनी सांगितले.
रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा
पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची वर्दळ वाढणार असल्याने खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शहर व उपनगरातील रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश
शहरासह उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढला असून त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. गणेशोत्सवात वाहतूक वाढणार असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असेही आमदार खताळ यांनी सांगितले.
लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारांची पाहणी करा
गणेशोत्सवाच्या काळात विविध भागांत गणेश मंडळांकडून देखावे, कमानी आणि विद्युत रोषणाई केली जाते. अशावेळी रस्त्यांवरील तसेच वस्त्यांमधील लोंबकळणाऱ्या वीजवाहक तारा धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे महावितरणने अशा ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. तसेच गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवा
गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे. शहर व ग्रामीण भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या.

बैठकीस संगमनेर उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे, उपअभियंता नामदेव शेळके, मुख्याधिकारी दयानंद गोरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर, तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
