“तुमचे २८ निवडून येतात अन् आमचे २ कसे पडतात ?” – अमर कतारी

नगरपरिषद निवडणुक राजकारण ; संगमनेर महाविकास आघाडीत खदखद !

संगमनेर प्रतिनिधी –

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह आणि दगाबाजीचा प्रकार आता चव्हाट्यावर आला आहे. “आघाडीच्या नावाखाली सोबत घ्यायचे आणि अधिकृत उमेदवारांचा राजकीय ‘कार्यक्रम’ करायचा,” असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी केला आहे. काँग्रेसचे २८ उमेदवार निवडून येतात आणि ठाकरे शिवसेनेचे २ अधिकृत उमेदवार कसे पराभूत होतात, असा सवाल उपस्थित करत त्यांनी स्थानिक काँग्रेस नेतृत्वाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने (सेवा समिती) २८ जागा लढवल्या होत्या, तर महाविकास आघाडीच्या जागावाटपानुसार ठाकरे शिवसेनेला २ जागा देण्यात आल्या होत्या. परंतु, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रसाद पवार आणि कविता कतारी या दोघांचाही पराभव झाला. उमेदवारांच्या विजयासाठी आघाडीतील घटक पक्षाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, उलट त्यांना पाडण्याचेच राजकारण झाले, अशी तीव्र भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे.

निवडणुकीतील पराभवानंतर स्वीकृत नगरसेवक निवडीच्या माध्यमातून ही दगाबाजीची जखम भरून काढण्याची संधी स्थानिक नेत्यांकडे होती. मात्र, तेथेही शिवसेनेला पूर्णपणे डावलून, विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यात आले. “ज्यांना गरज नव्हती त्यांना स्वीकृत सदस्य केले, पण आघाडीतील अधिकृत घटक असलेल्या शिवसेनेला एकही जागा दिली नाही,” असा घणाघाती आरोप कतारी यांनी केला आहे.

आपली भूमिका स्पष्ट करताना अमर कतारी म्हणाले, “महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील कार्याबद्दल किंवा त्यांच्या नेतृत्वाबाबत आमची कोणतीही नाराजी नाही, त्यांना १०० पैकी १०० मार्क आहेत. मात्र, नगरपरिषद पातळीवर स्थानिक नेत्यांकडून जो विश्वासघात, दगा आणि समन्वयाचा अभाव दाखवला गेला, त्यावर आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे.”

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही विसंगत राजकीय संस्कृती बदलणार का, असा सवाल कतारी यांनी केला आहे. “कोणी कशा पद्धतीने गद्दारी केली, विश्वासात घेऊन घात केला आणि कोण कुठे भेटले, हे सर्व माहीत असूनही आम्ही जाहीरपणे मांडत नाही आहोत. आमचा संघर्ष व्यक्तीविरोधात नसून आघाडीतील विश्वास, सन्मान आणि प्रामाणिक समन्वयासाठी आहे,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.

स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला विश्वासात न घेतल्यास आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या एकजुटीवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!