संगमनेर छत्रपती शिवरायांचे स्मारक…
‘कोण अडथळे आणतेय, कोण काम पुढे नेतंय, जनता पाहतेय !’ – माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड
संगमनेर प्रतिनिधी :
गेल्या दीड वर्षात स्मारकासाठी वाढीव जागेचा ठोस निर्णय घेता आला नाही आणि आता नगरपालिका प्रत्यक्ष काम पुढे नेत असताना त्यावर आक्षेप घेणे हा मोठा विरोधाभास असल्याची टीका माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक दिलीप पुंड यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा संगमनेरच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय असून, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. स्मारक अधिक भव्य, दिमाखदार आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी होण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून सहकार्य करावे, असे पुंड यांनी स्पष्ट केले.
स्मारकासाठी आवश्यक वाढीव जागेचा प्रश्न दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. नगरविकास व परिवहन खाते हातात असतानाही हा प्रश्न मार्गी का लावला नाही? असा थेट सवाल उपस्थित करत, आधी याचे उत्तर संगमनेरकरांना मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आमदार सत्यजित तांबे यांनी स्मारकासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, आता नगरपालिका प्रत्यक्ष उभारणीच्या दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे सुरू झालेल्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याऐवजी कामाला गती देणे गरजेचे आहे, असे पुंड म्हणाले.
वाढीव जागा मिळाल्यास तिचा उपयोग स्मारकाचा परिसर अधिक प्रशस्त, आकर्षक आणि सुविधायुक्त करण्यासाठी केला जाईल. मात्र वाढीव जागेचा मुद्दा पुढे करून सुरू असलेले काम थांबवण्याचा प्रयत्न योग्य नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
“छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाचे नसून संपूर्ण संगमनेरचे आहे. महाराजांच्या नावावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन संगमनेरकरांच्या अपेक्षेप्रमाणे भव्य-दिव्य स्मारक उभारावे,” असे आवाहन पुंड यांनी केले.
