बीजमातेच्या गावरान बियाणांच्या राख्या ; नात्यांसोबतच मातीशीही जोडला प्रेमाचा धागा !

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सीमेवरील जवानांसाठी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची अनोखी बीज राखी

अकोले | प्रतिनिधी

रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा धागा नव्हे, तर संस्कृती, माती आणि माणुसकीच्या नात्यांना अधिक घट्ट करणारा सण. याच भावनेला अनोखे आणि अर्थपूर्ण रूप देत पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त गावरान बियाणांपासून बीज राख्या तयार केल्या आहेत. परंपरेला संवर्धनाची जोड देणाऱ्या या राख्या सध्या विशेष आकर्षण ठरत आहेत.

आपल्या भावाप्रमाणे मानलेल्या मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी राहीबाईंनी स्वतःच्या हाताने बीज राखी तयार केली आहे. भात, नागली, वरई, काकडी, भोपळा, तूर, मूग, उडीद, वाल, घोसाळी, डांगर भोपळा अशा विविध गावरान बियांचा वापर करून साकारलेल्या या राखीत केवळ भावाचे औक्षण नाही, तर मातीशी असलेले नाते आणि गावरान बियाणे जपण्याचा संदेश सामावलेला आहे.

राहीबाई यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना गावरान बियाणांचे महत्त्व पटवून दिले आहे. बीज बँकेच्या माध्यमातून गावरान बियाणांचे संवर्धन आणि त्यांचा पुरवठा करताना अनेक शेतकऱ्यांशी त्यांचे बहिण-भावाचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. राहीबाईंच्या वात्सल्याने आणि प्रेमाने अनेक शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या आपुलकीच्या नात्याला जपण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रेमाचा आदर करण्यासाठी त्यांनी यंदा ‘बीज राखी’ या अभिनव संकल्पनेला आकार दिला आहे.

चंद्रकांतदादा पाटील हे राहीबाईंना भगिनी मानतात, तर राहीबाईदेखील त्यांना अत्यंत आदराचे स्थान देतात. या स्नेहबंधातूनच आपल्या प्रेमळ भावासाठी त्यांनी विशेष बीज राखी तयार केली आहे. राखीच्या प्रत्येक बियाण्यात प्रेम, आपुलकी आणि भविष्यातील समृद्धीचे बीज रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

‘एक धागा राष्ट्रबांधणीचा’

देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांविषयी मनात असलेला आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी राहीबाईंनी सैनिकांसाठीही बीज राख्या तयार करून त्या देशाच्या सीमेवर पाठवल्या आहेत. ‘एक धागा राष्ट्रबांधणीचा’ हा विचार पुढे नेत या राख्यांच्या माध्यमातून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

रक्षाबंधनाच्या पारंपरिक सणाला गावरान बियाणांच्या संवर्धनाची जोड देत राहीबाईंनी एक वेगळाच सांस्कृतिक संदेश समाजासमोर ठेवला आहे. राखीचा धागा नात्यांना जोडतो; तर या बीज राख्या माणसाला मातीशी, शेतीशी आणि निसर्गाशी जोडणारा धागा ठरत आहेत.

आपले काम निष्ठेने, सातत्याने आणि मनापासून केले तर त्याच कामातून समाजात वेगळी ओळख निर्माण करता येते, याचे उदाहरण राहीबाईंच्या कार्यातून सातत्याने समोर येते. गावरान बियाणांचे संवर्धन हा केवळ शेतीचा विषय न राहता तो परंपरा, संस्कृती आणि पुढील पिढ्यांच्या अन्नसुरक्षेशी जोडलेला वारसा आहे, हा संदेशही त्यांच्या बीज राख्यांमधून अधोरेखित झाला आहे.

यंदाच्या बीज राखी निर्मितीत राहीबाईंची नातवंडे सायली आणि धनश्री यांनीही मोलाची मदत केली. त्यामुळे या राख्यांना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या संस्कृतीच्या वारशाचेही सुंदर रूप लाभले आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बीज राखीच्या माध्यमातून प्रेमाचा धागा, मातीचा सुगंध आणि गावरान बियाणे संवर्धनाचा संदेश देत राहीबाईंनी देशवासीयांना एक अनोखी भेट आणि मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!