महिलांनी कोणाच्याही अधिपत्याखाली राहू नये ; राहुल गांधींचा मनुस्मृतीवर घणाघाती हल्ला
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यात आयोजित ‘छात्रो की गुंज’ (Chhatron Ki Goonj) या विद्यार्थी संवाद कार्यक्रमात मनुस्मृतीतील महिलांविषयीच्या कथित चौकटी आणि नियमांवर तीव्र टीका केली. महिलांना कायम पुरुषांच्या नियंत्रणाखाली ठेवण्याची मानसिकता ही लज्जास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी मनुस्मृतीतील एका संदर्भाचा दाखला देत, बाल्यावस्थेत वडील, युवावस्थेत पती आणि वृद्धावस्थेत मुलांच्या अधीन राहण्याची कल्पना मांडली गेल्याचे सांगितले. ‘महिलेने कधीही स्वतंत्र राहू नये’ अशी भूमिका मांडली जाणे हीच लज्जास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांची ओळख केवळ नात्यांपुरती मर्यादित नको
महिलांकडे केवळ मुलगी, पत्नी किंवा आई या भूमिकांमधून पाहिले जाते, असे राहुल गांधी म्हणाले. या नात्यांचा आदर असला तरी महिलांची ओळख केवळ एवढ्यापुरती मर्यादित नसावी. महिला कोणाच्याही मालकीच्या नसून त्या स्वतःच्या अस्तित्वाच्या मालक आहेत, असा मुद्दा त्यांनी मांडला.
‘महिलांची स्वप्ने ही देशाची ताकद’
भारतामधील कोट्यवधी महिलांची स्वप्ने आणि त्यांच्यातील क्षमता ही देशाची मोठी ताकद असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. महिलांच्या क्षमता आणि कल्पनाशक्तीला संधी मिळाल्यास देशाच्या प्रगतीला मोठी चालना मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांना चौकटी तोडण्याचे आवाहन
पुण्यातील या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. राजकीय भाषणापेक्षा तरुण-तरुणींनी संकोच आणि सामाजिक चौकटी बाजूला ठेवून स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राहुल गांधी यांच्या मनुस्मृती आणि महिलांच्या स्वातंत्र्याबाबतच्या या वक्तव्यामुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
