‘उलगुलान’चा आवाज मुंबईत –
विद्यार्थ्यांचा हक्कांसाठी लढा, सरकारची पोलिस कारवाई – डॉ. जयश्री थोरात
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
न्याय्य हक्कांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून २८ सप्टेंबर रोजी ‘उलगुलान’ मोर्चाच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने पायी निघालेले आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. नाशिकमध्ये ४० दिवसांहून अधिक काळ आंदोलन करूनही मागण्यांची अपेक्षित दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी न्याय मिळवण्यासाठी थेट मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला.
या आंदोलनाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसून, शिक्षण, हक्क आणि भवितव्याशी संबंधित प्रश्नांसाठी विद्यार्थी शांततेच्या मार्गाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

दरम्यान, मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवन येथे रात्रीच्या वेळी हे विद्यार्थी झोपलेले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांवर अशी कारवाई होत असेल, तर ही कारवाई नेमक्या कोणाच्या आदेशाने करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.
“विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य मागण्या मांडायच्या तरी कुठे?” असा प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला डॉ. जयश्री थोरात यांनीही पाठिंबा दर्शवला असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहून सरकारने त्यांच्याशी संवाद साधावा, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली आहे.
लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्रात आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशी वेळ येणे ही चिंतेची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. सरकारने विद्यार्थ्यांना वेठीस न धरता त्यांच्या मागण्यांवर ठोस भूमिका घ्यावी, त्यांच्याशी संवाद साधावा आणि न्याय्य मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

