व्यवस्थेचा ‘ब्लड कॅन्सर’ मुळापासून उपटून टाकावाच लागेल !

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात डॉ. जयश्री थोरात आक्रमक ; दाखल गुन्हे म्हणजे विद्यार्थ्यांचे ‘मेडल’

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी परीक्षा आणि आयोगाच्या व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचारावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “आपल्याला समाजातला आणि आयोगातला ‘ब्लड कॅन्सर’ मुळापासून उपटून टाकायचा आहे,” असे म्हणत त्यांनी व्यवस्थेतील त्रुटींविरोधात लढा देण्याचे आवाहन केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे ही त्यांच्या संघर्षाची ‘मेडल’ असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला.

विद्यार्थ्यांच्या संघर्षाला पाठिंबा

आंदोलनामुळे विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले तरी घाबरून न जाता आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहावे, असे डॉ. थोरात यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थिनींना सामाजिक आणि कौटुंबिक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीतही त्या अन्यायाविरोधात आवाज उठवत असल्याबद्दल त्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणे हीच परंपरा असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी आपली एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच परीक्षा व आयोगाच्या व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, दोषींवर जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधितांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.

संगमनेरमधून ५० युवक कार्यकर्त्यांचा सहभाग

गेल्या नऊ दिवसांपासून विश्वजित कदम, रोहित पवार आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह विविध नेते विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे वृत्त आहे. संगमनेर येथून आलेल्या सुमारे ५० युवक कार्यकर्त्यांसह डॉ. जयश्री थोरात यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती लावत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या भेटीमुळे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेरमधील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग दिसून आला.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय व्हावा, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर व्हाव्यात आणि संबंधित व्यवस्थेत पारदर्शकता यावी, ही आंदोलकांची प्रमुख अपेक्षा आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!