शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका ! निळवंडे धरणातून तातडीने आवर्तन सोडा ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
संगमनेर (प्रतिनिधी) :
निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, रब्बी पिके आणि मुक्या जनावरांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, शेतकरी व पशुधनाचे रक्षण करण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत निळवंडे धरणातून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी आक्रमक मागणी ‘निळवंडे पाटपाणी कृती समिती’ने केली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नावर तातडीने निर्णय न घेतल्यास संबंधित कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

पाण्याविना रब्बी हंगाम संकटात, पशुधन जगवण्याची चिंता
धरणातून यापूर्वी मिळालेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्याला जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. या काळात परिसरात अपेक्षित पाऊस न झाल्याने विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्त्रोत पूर्णपणे आटले आहेत. परिणामी, भूजल पातळी कमालीची खालावली असून शेतकऱ्यांसमोर रब्बी पिकांच्या उभारणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
पाण्यासाठी आणखी विलंब झाल्यास पिकांच्या वाढीचा महत्त्वाचा कालावधी हातातून निघून जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच, पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याची उपलब्धता देखील धोक्यात आल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.

समितीचा प्रशासनाला स्पष्ट इशारा
“शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका,” असा परखड इशारा देत कृती समितीने स्पष्ट केले आहे की, २० नोव्हेंबर २०२६ च्या दरम्यान आवर्तन न सोडल्यास रब्बी हंगाम पूर्णपणे वाया जाईल आणि पशुधनाचे अपरिमित नुकसान होईल. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलून आवर्तनाचे नियोजन करावे.
या निवेदनावर प्रभाकर आनंदा गायकवाड, प्रल्हाद लहानु गागरे, रंगनाथ धोंडीबा लोंढे, केशव सदाशिव मुसमाडे, मच्छिंद्र काळे, एम. डी. घोरपडे, विलास रंगनाथ गुळवे, अण्णासाहेब बजाबा वाघे, विजय रामचंद्र मगर आणि संतोष त्रिंबक राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच समितीचे अध्यक्ष नानासाहेब रेवजी शेळके, उपाध्यक्ष उत्तम भैरू घोरपडे आणि सचिव अण्णासाहेब वाघे हे या लढ्याचे नेतृत्व करत आहेत.

