धार्मिकतेचे राजकारण नको, विकासाचे राजकारण हवे ! – विवेकानंद पाटील
संगमनेरमध्ये युवकांशी साधला संवाद
संगमनेर (प्रतिनिधी) :
राजकारणात चांगल्या लोकांनी येणे आणि जनतेनेही सुज्ञ प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे. धार्मिकतेच्या राजकारणाऐवजी जनतेला विकासाचे राजकारण हवे आहे. तरुणांनी नेत्यांचे अंधभक्त न होता व्यवस्थेला प्रश्न विचारावेत आणि समतेचा विचार जोपासावा, असे प्रतिपादन एमपीएससी आंदोलनातील युवा नेतृत्व विवेकानंद पाटील यांनी केले.
सुदर्शन निवासस्थानी आयोजित युवक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी व युवक उपस्थित होते.

पाटील म्हणाले, आपण महात्मा गांधी यांच्या विचारांवर काम करतो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानतो. चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचे धैर्य तरुणांनी दाखवले पाहिजे. नेत्यांचे अंधभक्त झाल्यास लोकशाही कमकुवत होते. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी परिस्थिती पाहून सुज्ञपणे प्रश्न विचारणे आवश्यक आहे. सध्या राजकारण शहाण्या लोकांऐवजी अति शहाण्या लोकांच्या हाती गेले आहे. सोशल मीडियावरील टीकेकडे दुर्लक्ष करून तरुणांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे.
काँग्रेसने ७० वर्षांत देश उभा केला, तर गेल्या १२ वर्षांत काय केले, असा सवाल करत त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ४० वर्षांच्या कार्यकाळात संगमनेर तालुक्याला विकासाच्या माध्यमातून राज्यात दिशादर्शक बनविल्याचे सांगितले. नव्या पिढीला धार्मिकतेपेक्षा विकासाचे राजकारण अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, पुण्यातील एमपीएससी आंदोलनात विवेकानंद पाटील यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून सरकारला विचार करण्यास भाग पाडले. सध्या लोकशाहीसमोर गंभीर आव्हाने उभी आहेत. शेतकरी, सामान्य जनता आणि लोकशाहीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली. २०१४ नंतरचा कालखंड इतिहासात काळा कालखंड म्हणून नोंदवला जाईल, असे सांगत राहुल गांधी यांच्या संघर्षाचाही त्यांनी उल्लेख केला.
डॉ. जयश्री थोरात यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत-सुधारकांच्या समता व मानवतेच्या विचारांवर संगमनेरमध्ये काम सुरू असल्याचे सांगितले. अडचणी आल्या तरी हा विचार खंबीरपणे पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात तालुक्यातील युवकांनी विवेकानंद पाटील यांच्याशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. निखिल पापडेजा यांनी आभार मानले.
मोबाईलपेक्षा वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचा !
सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास न ठेवता तरुणांनी दररोज वर्तमानपत्रे, अग्रलेख आणि पुस्तके वाचावीत. त्यातून विचारशक्ती विकसित होईल आणि स्वतःचे वैचारिक स्थान अधिक भक्कम करता येईल, असा सल्ला विवेकानंद पाटील यांनी दिला.


