ज्ञानेशकुमार भाजपचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार ; माजी मंत्री बाळासाहेब थोरात
दुष्काळी पंचनाम्यासाठी दोन साक्षीदारांची अट म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा ; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
संगमनेर प्रतिनिधी –
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष आहे. एसआयआरच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी भाजपकडून निवडणूक आयोगाचे समर्थन केले जात आहे. निवडणूक आयोग भाजपचे बाहुले बनले असून, ज्ञानेशकुमार हे भाजपचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार बनले आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना पंचनाम्याचा फार्स न करता सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी. दुष्काळी पंचनाम्यासाठी दोन शेजारी शेतकऱ्यांना साक्षीदार करण्याची अट हास्यास्पद आहे. पाऊस न झाल्याने पिकांचे नुकसान झालेले प्रत्यक्ष दिसत असताना साक्षीदारांची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. या अटीमुळे शेतकऱ्यांमध्येच वाद निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, नैतिकतेच्या मुद्द्यावर एमपीएससी अध्यक्षांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी थोरात यांनी केली. शेतकरी, शेतमजूर आणि बारा बलुतेदारांच्या कुटुंबातील विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करतात; मात्र पेपरफुटीमुळे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, असे ते म्हणाले.
नाशिकहून न्यायाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अटक केल्याचा प्रकारही निंदनीय असल्याचे थोरात यांनी सांगितले. आश्रमशाळा, आदिवासी वसतिगृहांतील सुविधा आणि शिष्यवृत्ती यांसह विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारने संवेदनशीलतेने पाहून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

