महायुती सरकारला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही ; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सरकार कणखर — जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर प्रतिनिधी –
तहानलेल्या संगमनेर तालुक्यातील गावांना महायुती सरकारमुळे पाणी मिळाले. उन्हाळ्यातही २४७ तळी भरून देण्यात आली. पाणी देण्यासाठीही पायगुण चांगला लागतो. तालुक्यातील तळ्यांमध्ये पाणी जात असताना काहीजण कोणत्या पाण्यासाठी लढा देत आहेत, असा थेट सवाल करत महायुती सरकारला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कणखर आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
चिंचोली गुरव आणि पंचक्रोशीतील गावांसाठी सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीतून उपसा सिंचन पाईपलाईन कामाचा शुभारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार अमोल खताळ, भाजपचे सुदामराव सानप, कपिल पवार, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, भीमराज चतर, आबासाहेब थोरात, श्रीकांत गोमासे, जनार्दन आहेर, शरद गोर्डे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण झाला आहे. निळवंडे धरण पूर्ण होऊनही लाभक्षेत्राला पाण्याचा लाभ मिळत नव्हता. ही खंत लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने उपसा पद्धतीने नलिका वितरण प्रणालीच्या कामाला मान्यता दिली असून, त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

निळवंडेच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका
निळवंडेच्या विषयावरून यापूर्वी केवळ विखे परिवाराला बदनाम करण्यात आले. ‘जाणत्या राजाने’ पाच वेळा भूमिपूजनाचे कार्यक्रम केले; धरणाला ३५ वर्षे लागली. मात्र, महायुती सरकारने तीन वर्षांत पाणी दिले, असा दावा मंत्री विखे पाटील यांनी केला.
मागील उन्हाळ्यात २२७ तळी भरून देण्यात आली, तर भविष्यात २३९ तळी भरून देण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील तळ्यांमध्येच पाणी जात असताना काहीजण केवळ पाणी खाली चालले असल्याचे सांगतात. “तुमचा लढा नेमक्या कोणत्या पाण्यासाठी?”, असा थेट सवाल त्यांनी नाव न घेता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना केला.
दुष्काळाचे राजकारण केल्याचा विरोधकांवर आरोप
यंदा दुष्काळाचे सावट मोठे असून विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती भीषण आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने संकटावर मात करण्यासाठी सरकार सज्ज आहे, असे विखे पाटील म्हणाले.
विरोधक मात्र दुष्काळाचे राजकारण करीत आहेत. प्रत्येक प्रश्नाचे राजकारण करण्याची त्यांना सवय आहे. “तुम्ही काही करू शकला नाहीत म्हणून लोकांनी तुम्हाला घरी बसवले,” अशी टीकाही त्यांनी केली. ‘जाणत्या राजाने’ पत्र दिले, मात्र महायुती सरकारला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. संकटाला सामोरे जाण्यासाठी महायुती सरकार कणखर आहे, असे विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

‘पाण्यासाठी लढलो म्हणून १३ किलोमीटरच्या कामाला गती’
आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. “गडी पाण्यासाठी लढला म्हणूनच १३ किलोमीटर बंदिस्त योजनेच्या कामाला गती मिळाली,” असे ते म्हणाले.
लोकांविषयी आस्था आणि प्रेम असल्यामुळे अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होत आहे. या योजनेसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भोजापूर चारीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे ७२ दिवस पाणी मिळू शकले, असे खताळ यांनी सांगितले.
नदीजोड प्रकल्पात समावेश झाला असून आता देवनदीच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय देणार, असेही आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.
सौरऊर्जेवर भर ; विकासकामांना अडथळे आणू नका
वीजटंचाईवर मात करण्यासाठी मागणीनुसार डीपी उपलब्ध करून देण्यात आल्या. यापूर्वी डीपीसाठी पैसे घेतले गेले, असा आरोपही आमदार खताळ यांनी केला. महायुती सरकारच्या काळात सौरऊर्जेवर भर देण्यात आला आहे.

“विकासकामांमध्ये कुणी अडथळे आणू नका. काहींना माझे देवदर्शनही सहन होत नाही. मात्र, देव, देश आणि धर्मासाठी आपले काम सुरू आहे. कितीही टीका केली तरी सामान्य माणसांसाठी माझे काम सुरू राहील. सामान्य जनतेचे पाठबळ आपल्या पाठीशी आहे,” असे आमदार अमोल खताळ यांनी ठामपणे सांगितले. याप्रसंगी विठ्ठलराव घोरपडे आणि अभियंता प्रदीप हापसे यांचीही भाषणे झाली.
