चाळीस वर्षे फक्त वाळूवर राजकारण ; आमदार खताळ यांची थोरातांवर टीका
घरकुलाच्या लाभार्थी निवडीत पक्षपात झाल्याच्या तक्रारी ; अधिकाऱ्यांना पारदर्शकतेच्या सूचना
संगमनेर / प्रतिनिधी :
“ज्यांनी चाळीस वर्षे वाळूवर राजकारण केले, त्यांना आता घरकुलांसाठी वाळू मिळू नये, असे वाटत आहे. त्यांना राजकारण करू द्या. घरकुलांसाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध करून दिली असून, पुढील टप्प्यातही वाळू उपलब्ध करून दिली जाईल,” असे सांगत आमदार अमोल खताळ यांनी थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
संगमनेर पंचायत समितीत आयोजित आढावा बैठकीत आमदार खताळ बोलत होते. या बैठकीत शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, घरकुल, आरोग्य, कृषी, रोजगार हमी तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दोन मजली घर असलेल्यांनाही घरकुल ?
घरकुलाच्या लाभार्थी निवडीत पक्षपात होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे सांगत आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. “खऱ्या गरजू नागरिकांना घरकुलापासून वंचित ठेवता कामा नये. दोन मजली घर असलेल्या व्यक्तींनाही घरकुल मिळाल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वेळेत सादर करावेत. दिरंगाई झाल्यास कारवाई करण्याची वेळ आणू नका,” असा इशारा त्यांनी दिला. “आतापर्यंत कागदावरच संगमनेर तालुका चालला; आता मी प्रत्यक्ष लक्ष घातले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कामात गांभीर्य आणि पारदर्शकता ठेवावी,” असेही आमदार खताळ यांनी सांगितले.
संगमनेर टँकरमुक्त करण्यासाठी प्रयत्न
संगमनेर तालुका टँकरमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाला गती देण्यात येत असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. संगमनेरला विकासाचे रोल मॉडेल बनविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिकांना कोणी त्रास देत असल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा. आमदार म्हणून आपण त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी विभागनिहाय कामांची माहिती सादर केली.
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संगमनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. तालुक्यातील पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.
