भ्रामक, चुकीची माहिती पसरविणाऱ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेरात विकासापेक्षा ‘फ्लेक्सचे राजकारण’ 

संगमनेर प्रतिनिधी –

सोशल मीडियावरून भ्रामक माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या ‘बिनडोक सल्लागारां’ना आणि त्यांच्या सांगण्यावरून चुकीची माहिती पुढे नेणाऱ्यांना आता कायद्याचा धाक दाखवावाच लागेल, असा आक्रमक इशारा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. तालुक्यात विकासकामांपेक्षा ‘फ्लेक्सचे राजकारण’ रंगले असून, दुसरीकडे दुष्काळ, वीज आणि हक्काच्या पाण्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत, असा थेट निशाणा साधत थोरात यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

संगमनेर तालुक्यात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा उठसूट पत्रकार परिषदा घेऊन केवळ ‘फ्लेक्सचे राजकारण’ सुरू असल्याचा घणाघाती आरोपही थोरात यांनी केला. सहकारमहर्षी अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

पाणी-विजेच्या प्रश्नावर संघर्ष अटळ ?

तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे. पिके डोळ्यांसमोर जळत असताना विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्याचवेळी तालुक्याच्या हक्काचे पाणी पुढे जात असल्याचा मुद्दा उपस्थित करून हे पाणी रोखण्यासाठी, विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मोठा संघर्ष उभारण्याची गरज असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

‘९ हजार कोटींची समृद्धी मोडीत काढण्याचा डाव’

संगमनेरच्या सहकार क्षेत्राची ताकद अधोरेखित करताना तालुक्यातील पतसंस्था आणि बँकांमध्ये तब्बल ९ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे थोरात यांनी सांगितले. हीच संगमनेरची खरी आर्थिक ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

मात्र, काही मंडळी ही आर्थिक समृद्धी मोडीत काढण्यासाठी जाणीवपूर्वक कटकारस्थाने करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमृतवाहिनी बँकेने कठीण काळातही १२०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून, शेतकऱ्यांचा विश्वास कायम राखल्याचे त्यांनी सांगितले.

‘एका हाताने पैसे द्यायचे, दुसऱ्या हाताने परत घ्यायचे’

सरकारच्या धोरणांवर टीका करताना थोरात यांनी महागाई आणि खतांच्या वाढत्या किमतींचा मुद्दा उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणतीही अट न ठेवता दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

‘लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने महागाईच्या माध्यमातून तेच पैसे परत काढून घ्यायचे,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या धोरणावर निशाणा साधला.

सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी होते. यावेळी दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, इंद्रजीत थोरात, शंकरराव खेमनर, संचालक किसन सुपेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांच्यासह संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!