रेल्वे मार्गात कोणीतरी खुट्या ठोकल्या ; संगमनेरचा विकास रोखणाऱ्यांचा बाळासाहेब थोरातांनी घेतला खरपूस समाचार

संगमनेर प्रतिनिधी –

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग मार्केट कमिटीच्या उपबाजाराजवळून जात असताना आणि त्यामुळे संगमनेर तालुक्याच्या विकासाला मोठी गती मिळणार असताना, कोणीतरी या मार्गात ‘खुट्या ठोकून’ तो मार्ग बदलला, असा घणाघाती आरोप माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. संगमनेरचा नवीन लोकप्रतिनिधी यावर बोलताना “ही काय नेहरू गार्डन मधील रेल्वे आहे का?” अशी बालिश विधाने करतो, पण तालुक्याच्या मूलभूत प्रश्नांवर आणि रेल्वेबाबत एक शब्दही बोलत नाही, हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

वडगाव पान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात विविध विकासकामांचा शुभारंभ, शेतकरी मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती शंकर पाटील खेमनर होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा !

आपल्या आक्रमक भाषणात बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, “सध्या राज्यभरात अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पंचनाम्यांचे नाटक न करता सरकारने राज्यभरात सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस मदत द्यावी.”
बाजार समित्या मोडीत काढण्याचे कारस्थान
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सुरु केलेली बाजार समितीची संकल्पना आज केंद्र सरकारच्या धोरणांमुळे धोक्यात आली आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तीन ‘काळ्या कायद्यां’विरोधात हरियाणा व पंजाबमधील शेतकऱ्यांनी बलिदान दिले, त्यानंतरच सरकारला माघार घ्यावी लागली, अशी आठवण त्यांनी करून दिली. महसूल मंत्री असताना आपण वडगाव पान येथे १६ एकर जागा मिळवून दिल्यानेच आज येथे अत्याधुनिक भाजीपाला व खुली कांदा विक्री मार्केट उभे राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

पाण्याचा अधिकार हिरावल्यास तालुका उध्वस्त होईल ; २२ तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

निळवंडे धरण व कालव्यांचे काम पूर्ण केले असले तरी सध्या महावितरणकडून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. “वीज बंद करणे म्हणजे संगमनेरचे पाणी पुढे पळवून नेण्याचा डाव आहे. पाणी गेले तर तालुका उध्वस्त होईल. त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहून या प्रशासनावर धाक ठेवला पाहिजे,” असा इशारा थोरात यांनी दिला. या अन्यायाविरोधात येत्या २२ तारखेला निघणाऱ्या भव्य मोर्चामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!