पाठपुरावा बाळासाहेब थोरातांचाच – सिताराम राऊत 

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या अद्यावत रुग्णालयात विस्तारीकरण

संगमनेर प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विशेष पाठपुराव्यातून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात १०० खाटांची अत्याधुनिक इमारत उभारली जात आहे. या कामाला २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, सध्या या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिताराम राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

संगमनेर तालुका आणि परिसरातील रुग्णांची सोय व्हावी यासाठी १३ ऑगस्ट २०२२ रोजी या १०० खाटांच्या नवीन उपजिल्हा रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. घुलेवाडी ग्रामस्थांनी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर, येथे भविष्यात जिल्हा स्तरावरील रुग्णालय उभारू असा शब्द बाळासाहेब थोरात यांनी दिला होता. त्या शब्दाची पूर्तता करत त्यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. त्यामुळे या प्रशासकीय मान्यतेमध्ये कोणत्याही नवीन लोकप्रतिनिधीचा संबंध नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

या रुग्णालयाची इमारत उत्कृष्ट दर्जाची व्हावी यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार तांबे यांनी घुलेवाडी व साकूर ग्रामीण रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून, आमदार तांबे यांच्या सूचनेनुसार येथे पुरेसे डॉक्टर, परिचारिका आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले.

महिला रुग्णालयासाठीही विशेष प्रयत्न

घुलेवाडी रुग्णालयासोबतच संगमनेर शहरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय व्हावे यासाठीही बाळासाहेब थोरात यांनीच पुढाकार घेतला होता. या महिला रुग्णालयाला २०२० मध्ये मंजुरी मिळालेली असून, यामुळे संगमनेर परिसरातील आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलत आहे.

“माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेले हे १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय घुलेवाडीच्या वैभवात मोठी भर घालेल. एखाद्या प्रशस्त आणि अद्यावत इमारतीप्रमाणे ही नवीन इमारत उभी राहत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळतील.”

निर्मला राऊत (सरपंच, घुलेवाडी)

 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!