उपजिल्हा रुग्णालयाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करा ; अन्यथा ठेकेदार बदला – आमदार अमोल खताळ यांचा इशारा
संगमनेर / प्रतिनिधी :
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. मात्र, नवीन इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले. कामाला अपेक्षित गती न दिल्यास संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेऊन नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या सनियंत्रण व सल्लागार समितीची बैठक आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवशंकर वलांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, विनायक वाडेकर, विनोद सूर्यवंशी, सौरभ देशमुख आदी उपस्थित होते.

बांधकामाच्या गुणवत्तेशी तडजोड नको
उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे. कामाची गुणवत्ता आणि वेग यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मार्चपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश आमदार खताळ यांनी दिले.
उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज ट्रॉमा केअर सेंटरमधून सुरू राहणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या सध्याच्या जागेवर प्रस्तावित स्त्री रुग्णालय उभारण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
साकूर, चंदनापुरी आणि तळेगाव परिसरातील नागरिकांना शवविच्छेदनासाठी संगमनेरला यावे लागू नये, यासाठी या तीन ठिकाणी शवविच्छेदनगृहाची सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगताच जागेचा प्रश्न असल्यास तो तातडीने निदर्शनास आणून देण्याच्या सूचना आमदारांनी केल्या.

ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छ पाणीपुरवठा, पाण्याची टाकी, स्वच्छतागृह तसेच परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्या तातडीने दूर कराव्यात. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी रुग्णालय प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असेही आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.
धर्मादाय रुग्णालयांना फलक बंधनकारक
शहरातील धर्मादाय विभागाच्या यादीतील रुग्णालयांनी रुग्णालयाबाहेर ‘धर्मादाय रुग्णालय’ असा स्पष्ट फलक लावावा. संबंधित रुग्णालयांना तातडीने सूचना देऊन १५ दिवसांत पाहणीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
