अहिल्यानगर जिल्ह्यात २७३ बालके अति तीव्र कुपोषित ; अधिकाऱ्यांनी स्वीकारली पोषणाची जबाबदारी !

कुपोषणाचे विदारक वास्तव उघड ; ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ वर्षभर विशेष मोहीम

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल २७३ बालके अति तीव्र कुपोषणाच्या (SAM) श्रेणीत असल्याचे समोर आले आहे. बालकांच्या आरोग्य व पोषणस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ विशेष उपक्रम हाती घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी आणि पर्यवेक्षिकांनी या बालकांच्या पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

 २७३ बालकांसाठी अधिकाऱ्यांचा पुढाकार

या उपक्रमांतर्गत संबंधित पालक अधिकाऱ्यांनी बालकांच्या घरी प्रत्यक्ष गृहभेट देऊन त्यांच्या आरोग्याची, आहाराची आणि कुटुंबाच्या परिस्थितीची पाहणी केली. प्रत्येक बालकाला महिनाभर पुरेल इतका सकस आहार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूदही अधिकाऱ्यांनी स्वतः केली आहे.

आहारासोबत वैद्यकीय उपचारांवरही भर

बालकांच्या गरजेनुसार वैद्यकीय तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांच्या समन्वयातून कार्यवाही करण्यात येत आहे. नियुक्त अधिकारी दर महिन्याला किमान एकदा गृहभेट देऊन बालकांचे वजन, पोषणस्थिती, आरोग्य आणि उपचारांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.

कुपोषणमुक्तीचे आव्हान कायम

सर्व २७३ बालकांना सर्वसाधारण पोषण श्रेणीत आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ही बालके कुपोषणमुक्त झाल्यानंतर नव्याने आढळणाऱ्या अति तीव्र कुपोषित बालकांनाही या मोहिमेत सामावून घेतले जाणार असून, हा उपक्रम वर्षभर सुरू राहणार आहे.

जिल्ह्यातील २७३ बालकांचे अति तीव्र कुपोषण हे समाज आणि प्रशासनासमोरील गंभीर आव्हान आहे. अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारणे ही सकारात्मक बाब असली, तरी सकस आहार, नियमित वैद्यकीय उपचार आणि सातत्यपूर्ण देखरेखीतून बालकांच्या आरोग्यात प्रत्यक्ष सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे. कुपोषणामागील कारणे दूर करून प्रत्येक बालकाला निरोगी बालपण मिळवून देणे, हेच या मोहिमेच्या यशाचे खरे मोजमाप ठरणार आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!