रविवारी संगमनेरमध्ये ईएसआयएस सेवा दवाखान्याचे उद्घाटन ; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार

संगमनेर (प्रतिनिधी) : 

संगमनेर शहर व तालुक्यातील कामगार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या ईएसआयएस (ESIS) सेवा दवाखान्याचे उद्घाटन रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. याच दौऱ्यात आरोग्यमंत्री घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचीही पाहणी करणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या अंतर्गत संगमनेर येथे हा सेवा दवाखाना सुरू करण्यात येत आहे. या दवाखान्यामुळे संगमनेर परिसरातील कामगार, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचार व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेरमध्ये हा सेवा दवाखाना सुरू होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहणार आहेत.

या कार्यक्रमाला आमदार अमोल खताळ यांच्यासह महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, वैद्यकीय संचालक डॉ. अशोक थोरात, प्रशासन संचालक सोहम वायाळ आणि वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. अनिता भांबरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयालाही भेट देऊन तेथील आरोग्य सुविधा व कामकाजाची पाहणी करणार असल्याने या दौऱ्याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या उद्घाटन सोहळ्यास संगमनेर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी आणि कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना व महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!