संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पालक सचिवांकडून प्रत्यक्ष पाहणी दौरा ; पाणी, चारा आणि पीक नुकसानीचा घेतला आढावा
भविष्यातील नियोजनाचे अधिकाऱ्यांना निर्देश
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
संगमनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक सचिव तथा सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी पाणीटंचाई, पिकांचे नुकसान, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
दुष्काळी उपाययोजनांचे नियोजन करण्याचे निर्देश
चिंचेवाडी, जांभूळवाडी, खंडेरायवाडी आणि संगमनेर परिसरातील विविध ठिकाणी भेट देऊन पालक सचिव दराडे यांनी जलसंधारणाची कामे, चारा-पाणी नियोजन, संभाव्य चारा छावण्यांसाठीच्या जागा आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन गावनिहाय पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे. पशुधनासाठी आवश्यक चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी. गरज भासल्यास चारा छावण्या सुरू करण्यासाठी योग्य जागांची निवड करून पूर्वतयारी ठेवावी, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

शेतातील नुकसान आणि चारा साठ्याची पाहणी
चिंचेवाडी येथे शासनाच्या पाझर तलावाची पाहणी करण्यात आली. जांभूळवाडी येथील शेतकरी ज्ञानदेव सुभाष शिंदे यांच्या जनावरांच्या गोठ्याला भेट देऊन उपलब्ध चारा साठ्याची व पिकांची पाहणी केली. तसेच शासनाच्या गट क्रमांक ८६८ आणि ८७४ मधील चारा छावणीसाठी प्रस्तावित जागांची पाहणी केली.
खंडेरायवाडी गावठाणातील टँकरद्वारे आणलेले पाणी साठविण्याच्या जागेची (पाण्याची टाकी) पाहणी केली. शेतकरी पांडुरंग बाळकृष्ण तळेकर यांच्या शेततळ्याची तसेच पाण्याअभावी जळून गेलेल्या रब्बी पिकांची पाहणी केली. शेतकरी अण्णासाहेब भाऊसाहेब ढेरंगे यांच्या शेतातील पाण्याअभावी खराब झालेल्या कांदा पिकाचीही पाहणी करण्यात आली.

शेतकऱ्यांशी थेट संवाद
पाहणी दौऱ्यादरम्यान दराडे यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, पिकांचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याची समस्या आणि दैनंदिन अडचणी जाणून घेतल्या. टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा आणि नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहितीही घेतली.
या दौऱ्यातील पाहणीतून प्राप्त झालेली माहिती आणि दुष्काळग्रस्त भागातील वस्तुस्थितीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येणार असून, त्यानुसार आवश्यक उपाययोजनांबाबत कार्यवाही केली जाणार आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप खंडेराव, तालुका कृषी अधिकारी श्रीमती बोडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

