साकूर पठारच्या १५ गावांसाठी २२४.९४ कोटींची उपसा जलसिंचन योजना ; मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव !

आमदार अमोल खताळ यांची माहिती

संगमनेर / प्रतिनिधी

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील साकूर पठार परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. साकूर पठार उपसा जलसिंचन योजनेसाठी २२४.९४ कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे.

संगमनेर तालुक्यातील सिंचन आणि पाणीप्रश्नासंदर्भात मुंबई येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत साकूर पठार उपसा सिंचन योजनेसह भोजापूर परिसरातील गावांचा नदीजोड प्रकल्पात समावेश आणि निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्राबाहेरील गावांच्या सिंचनाचा प्रश्न यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संगमनेर तालुक्यातील खरशिंदे, शिंदोडी, बिरेवाडी, मांडवे बुद्रुक, साकूर, वरवंडी, रणखांब, ठाकुरवाडी, दरेवाडी, चौधरवाडी, कौठे मलकापूर, जांभुळवाडी, हिवरगाव पठार, कुंभारवाडी आणि कणसेवाडी या १५ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुळा धरणाच्या जलाशयातून साकूर उपसा सिंचन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेमुळे सुमारे ९०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, त्यासाठी ४.४९३ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.

या योजनेचे सर्वेक्षण, अन्वेषण आणि संकल्पनांचे काम पूर्ण झाले आहे. २२४.९४ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्यात आला असून, योजनेला खास बाब म्हणून मान्यता मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावरील पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती आमदार खताळ यांनी दिली.

भोजापूर परिसरातील १८ गावांच्या नदीजोड प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा

दरम्यान, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून भोजापूर परिसरातील १८ मुख्य गावांचा समावेश करण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या प्रकल्पामुळे संगमनेरच्या दुष्काळी भागातील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या परिसरातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने हा विषय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

निळवंडे लाभक्षेत्राबाहेरील गावांचाही प्रश्न ऐरणीवर

निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेर असलेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील गावांच्या सिंचनाचा प्रश्नही बैठकीत मांडण्यात आला. भंडारदरा आणि निळवंडे धरणांतून उपलब्ध होणारे १५ टीएमसी पाणी उल्हास-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून प्रवरा खोऱ्यात उपलब्ध होऊ शकते. या पाण्याचा उपयोग करून सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

५ डिसेंबरला भोजापूर पूरचारीची प्रत्यक्ष पाहणी

भोजापूर परिसरातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच भोजापूर पूरचारीच्या कामांनाही गती देण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतला आहे. पूरचारीच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेणे, स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या मागणीनुसार चारीचे रुंदीकरण करणे, तसेच कामांशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने येत्या ५ डिसेंबर रोजी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांसह प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

या दौऱ्यात प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. केवळ योजनांचे प्रस्ताव आणि बैठका यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामांना गती देऊन संगमनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

या बैठकीस प्रकाश मिसाळ (सचिव, लाभक्षेत्र विकास), जयंत गवळी (कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे महामंडळ), प्रसाद नार्वेकर (सहसचिव), अरुण नाईक (मुख्य अभियंता) आणि बाळासाहेब शेटे (अधीक्षक अभियंता) यांच्यासह जलसंपदा विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संगमनेरच्या दुष्काळी आणि अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे, हे माझे प्राधान्य आहे. साकूर उपसा सिंचन योजना असो, भोजापूर परिसरातील १८ गावांचा नदीजोड प्रकल्पात समावेश असो किंवा निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेरील गावांचा सिंचनाचा प्रश्न असो, हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. या महत्त्वपूर्ण विषयांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आभार. — अमोल खताळ, आमदार

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!