संगमनेरमध्ये आरोग्य सुविधांसाठी भरीव निधी देणार ; १५ दिवसांत कामगार रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क

राज्य कामगार विमा योजनेंतर्गत संगमनेरमध्ये कामगारांसाठी सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव निधी दिला जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कामगार रुग्णालयाचा प्रस्ताव येत्या १५ दिवसांत मंजूर करून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच महिला व शिशु रुग्णालयासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, लवकरच १०० बेडचे सुसज्ज रुग्णालय सेवेत दाखल होईल, अशी ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

आरोग्य संवाद यात्रेअंतर्गत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घुलेवाडी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधत उपचार, औषधे, भोजन आणि रुग्णालयातील सुविधांबाबत माहिती घेतली. रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा तपासण्यासाठी त्यांनी स्वतः विविध विभागांची पाहणी केली.

रुग्णालयातील आंतररुग्ण विभाग, महिला प्रसूती कक्ष, नवजात शिशू कक्ष, ट्रॉमा केअर सेंटर, शस्त्रक्रिया विभाग आणि टेलिमेडिसिन कक्षाला त्यांनी भेट दिली. रुग्णांना दिले जाणारे जेवण, औषधांची उपलब्धता आणि उपचारांच्या गुणवत्तेबाबत त्यांनी समाधानाची खातरजमा केली. ट्रॉमा केअर सेंटर अधिक सक्षम करण्यासह ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

कामगार विमा योजनेंतर्गत कामगारांच्या पाच कोटी रुपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची जबाबदारी योजनेमार्फत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य संवाद यात्रेतून आरोग्य यंत्रणेतील त्रुटी आणि सुधारणांसाठी आवश्यक उपाययोजना समजून घेता येत आहेत. रुग्णांना दर्जेदार सेवा मिळणे हेच आरोग्य विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेने काम करून आवश्यक सुविधांसाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, संगमनेर तालुक्यातील मोठ्या औद्योगिक समूहांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना या रुग्णालयाचा मोठा लाभ होणार आहे. यासाठी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून, आरोग्य विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कामगारांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्रॉमा केअर सेंटर लवकर कार्यान्वित करावे तसेच १०० बेडच्या महिला व शिशु रुग्णालयासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना भरती प्रक्रियेदरम्यान आवश्यक आरोग्य सुविधा आणि औषधोपचार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही आमदार खताळ यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी आरोग्य संचालक विजय कंदेवाड, प्रशासकीय अधिकारी अंजली नागापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, राज्य कामगार विमा योजनेच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. अनिता भामरे, डॉ. पावरा, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जऱ्हाड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!